भारत कधीही ‘दहशतीचे सूत्रधार’ व पीडितांची बरोबरी मान्य करणार नाही: एस. जयशंकर

भारत दहशतवादाविरोधातील ‘शून्य सहनशीलता’ धोरणावर ठाम आहे आणि तो कधीही ‘दहशतीचे सूत्रधार’ आणि पीडितांची बरोबरी मान्य करणार नाही, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लाम्मी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करताना ते बोलत होते.
भारत कधीही ‘दहशतीचे सूत्रधार’ व पीडितांची 
बरोबरी मान्य करणार नाही: एस. जयशंकर
@DrSJaishankar
Published on

नवी दिल्ली : भारत दहशतवादाविरोधातील ‘शून्य सहनशीलता’ धोरणावर ठाम आहे आणि तो कधीही ‘दहशतीचे सूत्रधार’ आणि पीडितांची बरोबरी मान्य करणार नाही, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. ब्रिटनचे नवे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लाम्मी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करताना ते बोलत होते.

अलीकडील काळात काही देशांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी व पर्यटक यांना एकाच पंक्तीत उभे करण्याचा प्रयत्न केल्याने दिल्लीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांच्या विधानाला विशेष महत्त्व आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री लाम्मी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर शनिवारी सकाळी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतला जाणार आहे. ब्रिटनच्या अधिकृत निवेदनानुसार, लाम्मी यांच्या भारतभेटीत व्यापार, गुंतवणूक आणि स्थलांतर यासंबंधी संबंध दृढ करणे, तसेच ब्रिटिश व्यवसायांसाठी संधी निर्माण करणे यावर भर असेल. जयशंकर यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी लाम्मी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

लाम्मी यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील 'क्रूर' दहशतवादी हल्ल्याचा ब्रिटनने केलेल्या तीव्र निषेधाबद्दल आभार मानले आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात ब्रिटनच्या पाठिंब्याचे कौतुक केले. जयशंकर म्हणाले, “आम्ही दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे आणि आमचे शेजारीही हे समजून घेतील अशी अपेक्षा आहे. आम्ही कधीही दुष्कर्म करणाऱ्यांना व हल्लापीडितांना एकाच रांगेत बसवू देणार नाही.”

भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सीमापार दहशतवादाचे आव्हान ब्रिटनसमोर स्पष्टपणे मांडल्याचे समजते. ७ ते १० मे दरम्यान भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या वेळी ब्रिटनसह काही देश दोघांशी संपर्कात होते. लाम्मी १६ मे रोजी दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानदरम्यान लष्करी कारवायांबाबत झालेल्या समझोत्याचे त्यांनी स्वागत केले. जयशंकर यांनी अलीकडेच पूर्ण झालेले भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि दुहेरी करार कर संमेलन हे 'एक मैलाचा दगड' असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हे करार केवळ द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणार नाहीत, तर आपले धोरणात्मक संबंधही अधिक मजबूत करतील.” ब्रिटनच्या निवेदनानुसार, लाम्मी स्थलांतर भागीदारीबाबत प्रगतीचे स्वागत करतील आणि दोन्ही देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी चर्चा करतील.

लाम्मी म्हणाले, “परराष्ट्र सचिव म्हणून भारत माझ्या पहिल्या भेटींपैकी एक होता आणि त्यानंतरपासून भारत आमच्या ‘प्लॅन फॉर चेंज’च्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा भागीदार ठरला आहे. आपले संबंध अधिक मजबूत झाले आहेत. तंत्रज्ञान, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांमध्ये प्रगती होत आहे.” लाम्मी भारतीय उद्योगजगतातील प्रमुख व्यक्तींनाही भेटणार असून भारताच्या कंपन्यांकडून ब्रिटनमध्ये अधिक गुंतवणुकीची संधी मिळावी यासाठी चर्चा करणार आहेत. २०२३-२४ मध्ये भारत सलग पाचव्या वर्षी ब्रिटनमध्ये प्रकल्पांच्या संख्येनुसार दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार ठरला.

जयशंकर यांनी विशेषतः टेक्नॉलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिव्हचा उल्लेख केला आणि सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर्स, टेलिकॉम, क्वांटम, हेल्थटेक, बायोटेक, क्रिटिकल मिनरल्स आणि अ‍ॅडव्हान्स मटेरिअल्स अशा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सखोल सहकार्य करण्यास ते मदत करेल. आम्ही धोरणात्मक निर्यात आणि तंत्रज्ञान सहकार्य संवादही सुरू केला असून याच्या पहिल्या बैठकीचे आयोजन याच आठवड्यात झाले. यामुळे उदयोन्मुख तंत्रज्ञानातील व्यापाराला चालना मिळेल, तसेच परवाने किंवा नियामक अडथळ्यांचे निराकरण होईल.

जयशंकर यांनी भारत-ब्रिटन पायाभूत वित्तीय ब्रिजविषयीही भाष्य करताना म्हटले की, ब्रिटनमधून भारतात गुणवत्ता असलेले दीर्घकालीन भांडवल प्रवाहित होऊ शकते, जे आपल्या पायाभूत विकासासाठी उपयुक्त ठरेल. ते म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये चांगले सहकार्य आहे. अनेक ब्रिटिश विद्यापीठे भारतात आपली केंद्रे स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. लोक-ते-लोक संबंधांच्या बाबतीत, मी स्वतः मँचेस्टर आणि बेलफास्टमध्ये दोन नवीन वाणिज्य दूतावास

उद्घाटनाचे भाग्य मिळवले.” या चर्चेचा केंद्रबिंदू म्हणजे भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ करणे आणि विविध क्षेत्रांत विस्तार करणे.

मुक्त व्यापार करार ही सुरुवात

“भारतासोबत मुक्त व्यापार करार ही केवळ सुरुवात आहे. आम्ही नव्या जागतिक युगासाठी आधुनिक भागीदारी निर्माण करत आहोत. नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, स्थलांतर आणि सुरक्षेचे मुद्दे हाताळणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे लाम्मी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in