चेन्नई :तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी करत तो संपवला पाहिजे, असे वक्तव्य केल्याने भाजपने ‘इंडिया’ आघाडीला लक्ष्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचा इतिहास, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करून इंडिया आघाडीला सत्ता ताब्यात घ्यायची आहे, अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला, तर स्टॅलिन यांची ही प्रवृत्ती नरसंहारक असल्याची टीका भाजपने केली आहे. काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनीही उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी “सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नसतो. त्या संपवाव्याच लागतात. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही, पण त्यांच्यापासून त्रास असल्याने त्या संपवण्याचा प्रयत्न करतो. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचे आहे,” असे वादग्रस्त विधान केले होते. यावर राजस्थानातील डुंगरपूर येथे रविवारी बोलताना अमित शहा म्हणाले, ‘‘काँग्रेस आणि डीएमके हे इंडिया आघाडीचे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्या पक्षाचा नेताच सनातन धर्म संपवण्याची भाषा करत आहे. हे केवळ मतांच्या राजकारणासाठी चालले आहे. मी गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाहतोय, इंडिया आघाडीचे नेते सातत्याने देशाच्या परंपरा, इतिहासाचा अपमान करत आहेत. त्यांना यातून काय साधायचे आहे. आपला धर्म संपवून यांना सत्ता मिळवायची आहे का, असा सवाल शहा यांनी केला.
इंडिया आघाडीचा समाचार घेताना अमित शहा म्हणाले, ‘‘काँग्रेसचे नेते म्हणताहेत मोदी पुन्हा सत्तेत आले तर या देशाची धर्मनिरपेक्षता संपेल आणि सनातन धर्मच प्रचलित होईल. पण, मला यांना सांगायचे आहे की सनातन धर्म हा लोकांच्या हृदयात आहे. तुम्हीच काय कोणीही त्यांच्या हृदयातून सनातन धर्म काढून टाकू शकत नाही.
दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी आपण सनातन धर्म संपवण्याची भाषा कधीच केली नसल्याचे म्हटले आहे. सनातन धर्म हा जात, धर्माच्या नावे समाजात फूट पाडत असून हे मुळातून बदलले पाहिजे, असे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे. कोरोना, डेंग्यू, मलेरियासारखे आजार डासांमुळे पसरतात, तसे सनातन धर्म अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करत असल्याचे आपण म्हटले होते, असेही स्टॅलिन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘‘भारतातील ८० टक्के लोक सनातन धर्माचे पालन करतात आणि या ८० टक्के जनतेचा नरसंहार करण्याची भाषा एका राज्याचा मंत्री करत आहे.’’ डीएमकेने स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेत्याने उपटले स्टॅलिन यांचे कान
काँग्रेस नेते आचार्य प्रमोद यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचे कान उपटले आहेत. “हिंदूंना शिव्या देण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. सनातन धर्माला संपवण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. पण, सनातन धर्माला कोणी संपवू शकले नाही. एक हजार वर्षे भारत गुलाम होता. सनातन धर्माला संपवण्याचे स्वप्न ब्रिटिश आणि मुघलांनी पाहिले. मात्र, सनातन धर्म संपू शकला नाही,” असे आचार्य प्रमोद यांनी म्हटले आहे.