
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी राहिली. त्यामुळे बुधवारी सेन्सेक्स पुन्हा ६० हजारांवर गेला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा सुरु झालेला ओघ लक्षात घेता बाजारात उत्साहाचे वातावरण होते.
दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ४१७.९२ अंक किंवा ०.७० टक्का वधारुन ६० हजारांचा टप्पा ओलांडून ६०,२६०.१३वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ११९ अंक किंवा ०.६७ टक्का वाढून १७,९४४.२५वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, भारती एअरटेल,टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी, विप्रो आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांच्या समभागात वाढ झाली. तर महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट आणि पॉवरग्रीड यांच्या समभागात घसरण झाली.
विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पुन्हा नव्याने खरेदी सुरु झाल्याने शेअर बाजारात तेजी परतली आहे. पाश्चात्य बाजारातील वाढती महागाई आणि भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याची चिन्हे असल्याने विदेशी गुंतवणूक संस्था शेअर बाजारात परतल्याचे दिसते. तसेच आंतराष्ट्रीय तेल बाजारात क्रूड तेलाच्या दरात झालेली घसरल्याने विदेशी गुंतवणूकदारांना पुन्हा विश्र्वास मिळाल्याने ते बाजारात परतले आहेत.
आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये वाढ तर सेऊलमध्ये घसरण झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती. अमेरिकन बाजारात मंगळवारी वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.१३ टक्का घसरुन ९२.२२ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल दर झाला.