भारताच्या आर्थिकवृद्धी अर्थात जीडीपी वृद्धीचा अंदाज कपात

भारताच्या आर्थिकवृद्धी अर्थात जीडीपी वृद्धीचा अंदाज कपात

चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहील. एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्जने बुधवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताच्या आर्थिकवृद्धी अर्थात जीडीपी वृद्धीचा अंदाज ७.८ टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तर पुढील आर्थिक वर्षासाठी विकासदर ६.५ टक्‍क्‍यांवर जाण्‍याचा अंदाज व्यक्त केला आहे.

एस ॲण्ड पीने म्हटले की, देशातील दीर्घकाळ चालणारी महागाई अर्थात चलनवाढ ही एक मोठी चिंता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नुकतीच व्याजदरवाढ केली आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेला व्याजदर आणखी वाढवावे लागतील. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षासाठी विकासदराचा अंदाज ७.३ टक्‍क्‍यांवर आणला आहे.

एस ॲण्ड पी ग्लोबलने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आमच्या अंदाजाच्या कपात करावी लागली, कारण देशातील वाढती महागाई आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका आणखी वाढू शकतो.

चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई ६.९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात (२०२१-२२) भारतीय अर्थव्यवस्थेने ८.९ टक्के जीडीपी वाढ नोंदवण्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध आणि वस्तूंच्या वाढत्या किमतींनंतर, विविध जागतिक संस्थांनी अलीकडेच भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे.

जागतिक बँकेकडून आरबीआयची कपात

जागतिक बँकेने एप्रिलमध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी अंदाज ८.७ टक्क्यांवरून ८ टक्के इतकी कमी केला, तर आयएमएफने अंदाज ९ टक्क्यांवरून ८.२ टक्क्यांवर कमी केला. याशिवाय आशियाई विकास बँकेने (एडीबी) भारताचा विकास दर ७.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर आरबीआयने आपला अंदाज ७.८ टक्क्यांवरून ७.२ टक्के एवढा कमी केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in