महागाई मुळे कंपन्यांची चिंता वाढली

 महागाई मुळे कंपन्यांची चिंता वाढली

खाद्यतेल, साबण, शाम्पू, पेट्रोल, डिझेल, दूध, कार, चप्पल-बूटापासून प्रत्येक वस्तू दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खर्च करण्यासाठी हात आखडता घेऊ लागला आहे. त्यामुळे कंपन्यांचे धाबे दणाणले असून त्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सर्वच क्षेत्रात बेसुमार महागाई वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भारतातील नागरिकांनी हात आखडता घेतला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरातील पुरवठा साखळ्या खंडित झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक देशात महागाईचा भडका उडत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात किंचीतही दरवाढ झाल्यास ग्राहकांचे महिन्याचे बजेट कोसळते. त्यामुळे नागरिकांनी हातचे राखून खर्च करायला सुरुवात केली आहे.

गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी यांनी सांगितले की, मार्च, एप्रिलपासून कंपनीची विक्री चांगली होती. मेपासून तिला ग्रहण लागले आहे. प्रत्येक तिमाहीत वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्याचा परिणाम मागणीवर होताना दिसत आहे. रुपया घसरल्याने आयात कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ झाली. ही परिस्थिती कायम राहिल्यास सणांच्या काळात मागणीवर परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.

गोदरेजसारखीच अवस्था देशातील सर्व कंपन्यांची झाली आहे. त्यांना नफा व मागणी यांची कसरत करावी लागत आहे. डाबर कंपनी शॉम्पू, टूथपेस्ट, फळांचे रस विकते. येते काही महिने मागणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली. ग्रामीण भागातील ग्राहकांनी खर्च कमी केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता ‘थांबा व वाट पाहा’ ही भूमिका घेणे योग्य ठरेल.

हिंदुस्थान युनिलिव्हर या बलाढ्य कंपनीलाही गेल्या महिन्यापासून मागणीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदी करतानाही त्यातही ग्राहक प्राधान्यक्रम निवडू लागले आहेत.

अर्थतज्ज्ञ प्रियांका किशोर म्हणाल्या की, कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती पेलवणे आता कंपन्यांनाही जड जात आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या डेल्टा विषाणूचा प्रादूर्भाव झाला होता. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्यात आता महागाईची भर पडू लागली आहे. वॉलमार्ट, कोहल समूह, टार्गेट ग्रुपने इशारा देताना सांगितले की, महागाईमुळे ग्राहकांची खरेदीची ताकद कमी होत आहे.

व्होल्टास कंपनीने सांगितले की, गेल्या तिमाहीत आम्ही उत्पादनाच्या किंमती वाढवल्या. मात्र, आम्ही ग्राहकांना इन्सेटिव्ह व वॉरंटी वाढवून दिली. तसेच ग्राहकांना वस्तू खरेदीसाठी सहज वित्तीय सहाय्य उपलब्ध करून दिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in