जयपूरमधील नीरजा मोदी शाळेत शनिवारी (दि. १) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. सहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केवळ विद्यार्थिनीचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर शाळांमधील सुरक्षा, मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीचे नाव अमायरा होते. ती इयत्ता सहावीत शिकत होती. नेहमीप्रमाणे अमायरा शनिवारी (दि. १) शाळेत गेली. साधारण दुपारी १२ वाजता ती बाथरूममध्ये गेली त्यानंतर ती चौथ्या मजल्यावर आली. तिने रेलिंग ओलांडली. आजूबाजूला पाहिले आणि उडी मारली. तिने सुमारे ४७ फूट उंचीवरून उडी मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शिक्षक आणि कर्मचारी मदतीसाठी धावले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिला तातडीने मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
एकुलत्या एक मुलीची आत्महत्या
अमायरा ही तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई बँकेत नोकरी करते तर वडील खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर पोस्टमार्टमची औपचारिकता पूर्ण करून कुटुंबाने FIR दाखल केला. पोलिसांनी घटनाक्रमाचा तपास सुरू केला आहे.
शाळेकडून पुराव्यांशी छेडछाड?
मानसरोवर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लखन खटाना यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्येची घटना वाटत असली तरी तिच्या कृतीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिस जेव्हा शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली. ज्या जागी मुलगी पडली होती ती जागा आधीच स्वच्छ करण्यात आली होती. रक्ताचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. यामुळे पालकांचा संताप झाला असून त्यांनी शाळेवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
पालकांचा आरोप
अमायराच्या पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध FIR नोंदवला असून मृत्यू 'संशयास्पद' असल्याचे म्हटले आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. घटनेनंतरही नीरजा मोदी शाळेच्या प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
या घटनेने खळबळ उडाली असून, तपासाचा अहवाल समोर आल्यानंतरच अमायराच्या मृत्यूमागील खरी कारणे उघड होणार आहेत.