नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले आहे. राज्यातील शेतकरी या निवडणुकीत महत्त्वाचा निर्णायक घटक ठरणार आहे. आपल्या सरकारने त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, असेही बघेल यांनी यावेळी अधोरेखित केले.
बघेल यांनी ९० सदस्यांच्या या विधानसभेतील ७५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. शेतकरी हा घटक काँग्रेसच्या बाजूने आहे, असे त्यांचे मत आहे. तसेच महिला, तरुण आणि व्यापारी देखील काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान आहे तरी देखील काँग्रेस पुन्हा सत्तेत येर्इल, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला या राज्यात धुळीस मिळवले होते. केवळ १५ जागा भाजपला मिळाल्या होत्या, तर काँग्रेसने ६८ जागा जिंकून सत्ता मिळवली होती. येत्या ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी २० जागांसाठी, तर १७ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ९० जागांचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. भाजपने बघेल सरकारवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.