‘महादेव बेटिंग अॅप’चे डी-गँगशी कनेक्शन

राजकीय व्यक्ती, सरकारी अधिकाऱ्यांनाही पैसे दिल्याची माहिती
‘महादेव बेटिंग अॅप’चे डी-गँगशी कनेक्शन

मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींची नावे पुढे आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचेही कनेक्शन असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर ऑनलाईन सट्टेबाजी अॅप रॅकेटमधील पैसे किमान ५०० हवाला ऑपरेटर आणि सुमारे ७० शेल कंपन्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ राजकारणी, नोकरशहा, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना दिले गेल्याची माहिती समोर आली आहे.

दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम अली कासकर हा सौरभ चंद्राकरच्या संपर्कात आला आणि त्याला पाकिस्तानसाठी असेच बेटिंग प्लॅटफॉर्म बनवण्यास सांगितले, असे तपासात समोर आल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांची डी-कंपनीशी हातमिळवणी केली होती. दाऊद इब्राहिमने स्थापन केलेले गुन्हेगारी सिंडिकेट या प्रकरणात कार्यरत असल्याचे ईडीच्या तपासादरम्यान आढळले आहे. ईडीने सांगितले की, या ॲपचे प्रवर्तक दाऊद इब्राहिमच्या भावाच्या संपर्कात होते. ते पाकिस्तानसाठी स्वतंत्र ॲप तयार करत होते. या माहितीच्या आधारे ईडी सौरभ चंद्राकर याच्यावर दहशतवादाशी संबंधित आरोप लावण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

देशाविरोधात आर्थिक कट

महादेव ऑनलाईन सट्टेबाजी अॅपच्या यशानंतर दाऊद इब्राहिमचा भाऊ मुस्तकीम अली कासकर सौरभ चंद्राकरच्या संपर्कात आला आणि त्याला पाकिस्तानसाठी असेच सट्टेबाजीचे ॲप तयार करण्यास सांगितले. मुस्तकीमने चंद्रकरला त्याच्या दुबई भेटीत सुमारे ३० अंगरक्षकही दिले होते. महादेव सट्टेबाजी अॅपच्या तपासात महत्त्वाची माहिती आणि तपशील ईडीच्या हाती लागली असून यात देशाविरोधात आर्थिक कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in