मोदींचाच जगात डंका ७६ टक्के मतांसह पहिल्या क्रमांकावर : बायडेन सातव्या स्थानी

केवळ १८ टक्के जणांनीच मोदींना नाकारले आहे
मोदींचाच जगात डंका ७६ टक्के मतांसह पहिल्या क्रमांकावर : बायडेन सातव्या स्थानी
@ANI

नवी दिल्ली : देशातील विरोधकांनी कितीही हिणवले व नकारात्मक टीका केली तरी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक ७६ टक्के मते मिळवून पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या अन‌् तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे स्वित्झर्लंडचे अॅलेन बेरसेट व मेक्सिकोचे अॅन्ड्रेस ओब्रॅडर आहेत. अमेरिकेचे जो बायडेन पार सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल लीडर अॅप्रुव्हल सर्वेक्षणातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोदी सातत्याने या सर्वेक्षणात पहिला क्रमांक पटकावत आहेत.

सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी आपल्या पुढच्या स्पर्धकापासून म्हणजे स्वित्झर्लंडच्या अलेन बेरेस्ट यांच्यापासून १२ टक्के मते मिळवून पुढे आहेत. स्वित्झर्लंडच्या अध्यक्षांना ६४ टक्के मते मिळाली आहेत. त्याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावरील मेक्सिकोच्या अध्यक्षांना ६४ टक्के मते मिळाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना मात्र केवळ ४० टक्के मते मिळाली असून ते सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. ग्लोबल लीडर अॅप्रुव्हल सर्वेक्षण ६ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. यात केवळ १८ टक्के जणांनीच मोदींना नाकारले आहे. नाकारण्याचे प्रमाण देखील मोदींचेच सर्वात कमी आहे.

पहिल्या दहा नेत्यांमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना सर्वाधिक म्हणजे ५८ टक्के जणांनी जागतिक लीडर म्हणून नाकारले आहे. या सर्वेक्षणात एकूण २२ जागतिक नेत्यांबाबत मते मागवण्यात आली होती. पैकी टॉप दहा नेत्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जागतिक नेता म्हणून दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सेउक-यूल, चेक रिपब्लिकचे अध्यक्ष पीटर पावेल यांना सर्वात कमी २० टक्के होकारात्मक मते मिळाली आहेत. यादीत नरेंद्र मोदी, अॅलेन बेरसेट आणि अॅन्ड्रेस ओब्रॅडर यांच्यानंतर अन्य नेत्यांमध्ये लुई डिसिल्हा- ब्राझील, अँथनी अल्बानीस- ऑस्ट्रेलिया, जॉर्जिया मेलोनी- इटली यांनी अनुक्रमे चौथे, पाचवे व सहावे स्थान पटकावले आहे. आठव्या स्थानावर स्पेनचे पेंड्रो सँचेझ, तर नवव्या स्थानावर आयर्लंडचे लिओ वराडकर आहेत, तर दहाव्या स्थानावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in