म्युच्युअल फंडांनी केले १.०८ लाख कोटी रुपये केले जमा

म्युच्युअल फंडांनी केले १.०८ लाख कोटी रुपये केले जमा

किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा कायम आहे. २०२२ मध्ये म्युच्युअल फंडांनी १७६ नवीन फंडातून १.०८ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. एफवायईआरचे संशोधन प्रमुख गोपाल कवलीरेड्डी म्हणाले की, व्याजदर वाढ, कठोर पतपुरवठा, बंद झालेले वर्क फ्रॉम होम त्यामुळे एनएफओकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. एफएमपी श्रेणीतील उत्पादन वाढताना दिसत आहेत. सर्वच म्युच्युअल फंड कंपन्यांनी नवीन योजना सर्वच श्रेणीत आणल्या आहेत. ज्या कंपन्यांकडे जी उत्पादने नव्हती. ती उत्पादने या कंपन्या बाजारात आणत आहेत. फंड हाऊसची विश्वासर्हता, फंड मॅनेजर्सची कामगिरी, समभाग बाजारातील कामगिरी पाहिली जात आहे.

मॉर्निंगस्टार इंडियाने सांगितले की, १७६ नवीन योजना म्युच्युअल फंड कंपन्यांनी आणल्या आहेत. त्यात क्लोज एंडेड फंडापासून ईटीएफपर्यंतची सर्व उत्पादने आहेत. यातून कंपन्यांनी १,०७,८९६ कोटी रुपये गोळा केले. २०२०-२१ मध्ये ८४ एनएफओे आले होते. त्यातून ४२०३८ कोटी रुपये जमा करण्यात आले.

बाजार वाढत असताना हे एनएफओ बाजारात आणले. त्यामुळे गुंतवणूकदार हे आशावादी होते. मार्च २०२० नंतर गुंतवणूकदारांच्या भावना सकारात्मक होऊ लागल्या. त्यानंतर एनएफओचे प्रमाण वाढू लागले. सेबी व ॲम्फीने गुंतवणूकदारांसाठी नवीन सुविधा लागू केल्या आहेत. त्यात एक्झीट लोड काढून टाकणे, एंट्री लोडवर मर्यादा आणणे, म्युच्युअल फंड योजनांचे वर्गीकरण करणे, डायरेक्ट प्लॅन्स, रिस्क ओ मीटर, फ्लेक्सीकॅप नावाची नवीन श्रेणी, गुंतवणूकदारांसाठी जनजागृती, गुंतवणुकीत पारदर्शकता आदी बाबी आणल्या. नवीन योजनांमध्ये इंडेक्स, ईटीएफ श्रेणीचा समावेश होता. ४९ योजना या इंडेक्स श्रेणीत होत्या. त्यातून १०६२९ कोटी जमा केले. ईटीएफमधून ३४ योजनांतून ७६१९ कोटी, ३२ एफएमपीतून ५७५१ कोटी रुपये जमा केले.

आंतरराष्ट्रीय व थिमॅटिक फंडांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. त्यातून कंपन्यांनी ५२१८ कोटी जमा केले. ११ सेक्टर फंडातून ९१२७ कोटी रुपये जमा केले. २०२२-२३ मध्ये आतापर्यंत चारच नवीन फंड सुरू झाले आहेत. त्यातून त्यांनी ३३०७ कोटी जमा केले. त्यातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल हाऊसिंग ऑपॉच्युनिटीज फंडाने ३१५९ कोटी जमा केले. सेबीने १ जुलैपर्यंत नवीन म्युच्युअल फंड स्कीम आणण्यास बंदी घातली आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी सेबीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यात आता नवीन योजनेची भर पडली आहे. आता गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यानंतर ती थेट म्युच्युअल फंड कंपनीकडे केली पाहिजे. त्यात मध्यस्थ नको, असे सेबीने सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना बजावले आहे. त्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. कारण गुंतवणूकदारांना त्याच दिवशीचा एनएव्ही मिळणार आहे. १ जुलै २०२२ पासून नवीन रचना तयार करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. यापूर्वी गुंतवणूकदारांचे पैसे मध्यस्थांच्या बँक खात्यात जात होते. तेथून ते म्युच्युअल फंड कंपन्यांकडे जात होते. त्यामुळे कंपन्यांना पैसे मिळण्यास दोन ते तीन दिवस लागत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होत होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in