राफेल मरिनला नौदलाची पसंती

मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात कराराची शक्यता
राफेल मरिनला नौदलाची पसंती

नवी दिल्ली : स्वदेशी बांधणीच्या नवीन विक्रांत या विमानवाहू नौकेवर तैनात करण्यासाठी फ्रान्सच्या राफेल मरिन या लढाऊ विमानांना भारतीय नौदलाने पसंती दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील आठवड्यातील नियोजित फ्रान्स दौऱ्यात याबाबत करार होण्याची शक्यता आहे.

राफेल मरिन प्रकारची २४ ते ३० विमाने विकत घेण्याचा नौदलाचा मनोदय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३-१४ जुलै रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी संरक्षण सामग्रीची खरेदी करण्याविषयीच्या संरक्षण संपादन परिषदेच्या (डिफेन्स अॅक्विझिशन काऊन्सिल) बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांतील करार होऊ शकतो. भारताने ही विमाने विकत घेण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांमध्ये थेट करार करण्याचा पर्याय निवडला आहे. नेहमीच्या निविदा मागवण्याच्या प्रक्रियेपेक्षा या प्रकारे अधिक वेगाने खरेदी करणे शक्य आहे. राफेल मरिन विमानाच्या किमतीविषयी अद्याप स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, हा करार काही अब्ज डॉलर्सचा असू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भारतीय नौदलाच्या जुन्या विक्रांत आणि विराट या विमानवाहू नौकांवर ब्रिटिश बनावटीची सी-हॅरियर ही लढाऊ विमाने तैनात होती. काही वर्षांपूर्वी रशियाकडून विकत घेतलेल्या विक्रमादित्य या नौकेवर मिग-२९ के या प्रकारची विमाने आहेत. आता देशातच बांधणी केलेल्या नव्या विक्रांत या विमानवाहू नौकेवर कोणती विमाने तैनात करायची, यावर नौदलात विचारविनिमय सुरू आहे. त्यासाठी फ्रान्सच्या दसाँ कंपनीच्या राफेल या लढाऊ विमानांची नौदलासाठीची आवृत्ती राफेल मरिन आणि अमेरिकेच्या एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट या विमानांचा अंतिम टप्प्यात विचार केला जात होता. त्यात नौदलाने राफेल मरिन या विमानांना पसंती दर्शवली आहे. राफेल मरिन ही विमाने रशियाच्या मिग-२९ के विमानांपेक्षा सरस असल्याचे मानले जाते. त्याशिवाय, भारतीय हवाई दलाकडे यापूर्वीच घेतलेली ३६ राफेल विमाने आहेत. त्या राफेल आणि नौदलासाठीच्या राफेल मरिन या विमानांमध्ये जवळपास ८० टक्के साम्य आहे. त्यामुळे नौदलाचा प्रशिक्षण, देखभाल-दुरुस्ती आदींसाठीचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in