राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक

४० आमदार व खासदारांच्या सह्या असल्याचा दावा
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रवारी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुरुवारी नवी दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीत पुतण्या अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच या बंडाविषयी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याशी कसा लढा द्यावा, याची रणनीती देखील ठरवण्यात येणार आहे.
मुंबर्इत शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बैठका बुधवारी पार पडल्यानंतर सायंकाळी दिल्लीस रवाना होताना आपल्या निवासस्थानातून त्यांनी कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. अजित पवार गटाचे ३० जून रोजीचे पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी मिळाले आहे. ज्यात अजित पवार यांनी एनसीपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वत:कडे घेतले असून, त्यांच्या गटाला पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या पत्रात अजित पवार यांची केव्हा आणि कोठे अध्यक्षपदावर निवड झाली याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच किती जण या निवड प्रक्रियेत सहभागी होते याचा देखील त्यात उल्लेख नाही. शरद पवार हेच पक्षाचे तहहयात अध्यक्ष असल्यामुळे या पक्षाचा अन्य कुणी अध्यक्षच होऊ शकत नाही, असा दावा पवार गटाकडून करण्यात आला आहे.

यास निवडणूक आयोगाची मान्यता देखील आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्याकडे दोन्ही बाजूंची पत्रे मिळाली असल्याची माहिती दिली आहे. पण त्यांचे दावे मान्य करण्याकरिता या पत्रांना आवश्यक दस्तावेज जोडण्यात आलेले नाहीत, असेही आयोगाने सांगितले आहे. शरद पवार गटाने आयोगाकडे ३ जुलै रोजी कॅव्हिएट सादर केले होते. त्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाचे कोणताही अर्ज स्वीकारला जाऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आयोगाला अजित पवार गटाचे ३ जुलै रोजीचे पत्र ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे. त्यात ४० आमदार व खासदारांच्या सह्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयोगाने या पत्राची नोंद घेतली असून, त्याला ‘वादग्रस्त प्रकरण’ गटात सामील केले आहे. तसेच शरद पवार यांना या पत्रावर प्रतिक्रिया देण्यासाठी पाठवून देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in