नीट-यूजी परीक्षा गैरप्रकार: तपास सीबीआयकडे; ८१३ जणांनी दिली फेरपरीक्षा

स्पर्धात्मक परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आणि अनियमिततेला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री कडक कायदा अंमलात आणून त्याबाबतची अधिसूचना जारी केल्यानंतर आता वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ आयोजनात झालेल्या अनियमिततेबद्दल सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे
नीट-यूजी परीक्षा गैरप्रकार: तपास सीबीआयकडे; ८१३ जणांनी दिली फेरपरीक्षा
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa

नवी दिल्ली : स्पर्धात्मक परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार आणि अनियमिततेला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी मध्यरात्री कडक कायदा अंमलात आणून त्याबाबतची अधिसूचना जारी केल्यानंतर आता वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी’ आयोजनात झालेल्या अनियमिततेबद्दल सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे, असे रविवारी सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही परीक्षा ५ मे रोजी घेण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत विविध राज्यांमध्ये नोंदविलेल्या तक्रारीही सीबीआयच्या कक्षेत आणण्यासाठी पावले उचलली आहेत.

या परीक्षेत झालेल्या अनियमिततेचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. सीबीआयने अज्ञात व्यक्तींविरुद्ध आता नव्याने गुन्हा नोंदविला आहे. ही परीक्षा ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती आणि त्यामध्ये २४ लाख उमेदवार सहभागी झाले होते.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला. नीट-यूजीमध्ये अनेक गैरप्रकार, अनियमितता, फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि व्यापक तपासासाठी सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केवळ ८१३ जणांनी दिली ‘नीट’ फेरपरीक्षा

‘नीट’ परीक्षेत १,५६३ जणांना ग्रेस मार्क मिळाले होते. त्यांची रविवारी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या फेरपरीक्षेला १,५६३ पैकी ८१३ जणच बसल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सात केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. १,५६३ पैकी केवळ ८१३ विद्यार्थीच या फेरपरीक्षेला बसले, असे ‘एनटीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लातूरमधील दोन शिक्षकांना चौकशीनंतर सोडले

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी प्रकरणातील अनियमितताप्रकरणी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) लातूरमध्ये खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले. एटीएसच्या नांदेड विभागाने शनिवारी रात्री या दोघांना ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. यापैकी एक शिक्षक लातूरच्या सरकारी शाळेतील आहे. गरज भासल्यास एटीएस त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करणार आहे. परीक्षेतील अनियमिततेचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in