नवी दिल्ली - ड्रोन वापरून शस्त्रास्त्रांच्या सीमापार तस्करी करण्याच्या आरोपांवरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मलकित सिंग ऊर्फ पिस्तोल याच्यावर एफआयआर दाखल केले आहे. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात सीमेवर ही शस्त्रतस्करी तो करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंजाबमध्ये मोहालीतील एनआयएच्या विशेष न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
२४ मार्च रोजी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी भगटाणा-बोहरवाला गावातील मैदानात असलेल्या एका दफनभूमीतून पाच ऑस्ट्रिया बनावटीची पिस्तूल, १० मॅगझिन आणि ९१ जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर बटाला येथील डेरा बाबा नानक पोलीस ठाण्यात सुरुवातीला गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी एनआयएने शस्त्रास्त्र कायदा, विमान कायदा आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांतर्गत पुन्हा गुन्हा नोंदवला. अधिकाऱ्याने सांगितले की, प्रतिबंधित दहशतवादी संघटना खलिस्तान लिबरेशन फोर्सचे सदस्य आणि पाकिस्तानमधील व्यक्ती यांच्यातील संबंध तपासात उघड झाले आहेत.
"या दहशतवाद्यांच्या टोळीतील आरोपींमध्ये मलकित सिंग, तरनजोत सिंग उर्फ 'तन्ना' आणि गुरजित सिंग उर्फ 'पा' यांचा समावेश आहे. शिवाय, ते पाकिस्तानस्थित ड्रग्ज तस्कर, रहमत अली उर्फ ' मियां', पाकिस्तानस्थित खलिस्तान लिबरेशन आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचा प्रमुख लखबीर सिंग रोडे उर्फ 'बाबाजी' आणि रणज्योतसिंग राणा, यांच्याशी थेट संपर्कात असल्याचे आढळून आले, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
अधिकाऱ्याने सांगितले की, खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांवरील सशस्त्र हल्ले, तसेच गुन्हेगारी धमकी, खून, खंडणी, दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करणे यासाठी सरकारने बंदी घातली होती.