
नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात लोकसभेत सादर केलेल्या अविश्वास ठरावावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले की, पंतप्रधान जेव्हा जागतिक नेता म्हणून पुढे येत असून, देश २०४७ पर्यंत विकसित देश होण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा वेळी विरोधकांनी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची काहीही गरज नव्हती.
विरोधकांनी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याऐवजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सरकारच्या हातात हात मिळवले पाहिजे आणि पंतप्रधानांनी ठरवून दिलेले पुढील २५ वर्षांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम केले पाहिजे, असेही रिजिजू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष हा अविश्वास ठराव आणून पश्चात्ताप करणार आहेत, कारण तो चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला आहे. तेव्हा विरोधकांनी विरोध सोडावा आणि भारत विकसित देश करण्याच्या यात्रेत सहभागी व्हावे. यावेळी त्यांनी मोदी सरकारने विविध क्षेत्रात केलेल्या कामांची विरोधकांना आठवण करून दिली. तुम्हाला मोदी किंवा भाजप आवडत नसेल, पण तुम्ही भारताला पाठिंबा देऊच शकता. इंडिया नाव धारण करून तुम्ही इंडियाला विरोध करू शकत नाही. २०१४ सालापासून सरकारने केलेल्या सुधारणांमुळे देश जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था झाली आहे. देशाने अंतराळ संशोधन क्षेत्रात आघाडी घेतली असून, चांद्रयान-३ अंतिम टप्प्यात आले आहे. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज आहे. तेव्हा विरोधकांनी विदेशी विद्यापीठांमध्ये जाऊन देशविरोधी भाषणे करण्यापेक्षा देशातील व्यवस्थेला पाठिंबा द्यावा, असा चिमटा नाव न घेता त्यांनी राहुल गांधी यांना काढला. आपले अंतर्गत प्रश्न सोडवण्यास देश सक्षम आहे. तेव्हा विदेशी शक्तींना आमच्या देशात ढवळाढवळ करण्याची गरज नाही, असेही रिजिजू यावेळी म्हणाले. ते म्हणाले, मणिपूरमधील सध्या सुरू असलेल्या समस्यांचे मूळ कॉंग्रेस सरकारच्या कारकीर्दीपासूनचे आहे, अशी टिप्पणी देखील त्यांनी मणिपूर समस्येबाबत बोलताना केली आहे.