लोकसभा अध्यक्षांविरोधातच अविश्वास ठराव? राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा अध्यक्षांवर केली होती टीका
लोकसभा अध्यक्षांविरोधातच अविश्वास ठराव? राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावरून देशभरात हल्लकल्लोळ माजला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसोबतच लोकसभा अध्यक्षांवरही निशाणा साधला होता. यावरून आता काँग्रेससह विरोधी पक्षांचे गट आक्रमक झाले असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे.

राहुल गांधींचे सदस्यत्व निलंबित करणे आणि सभागृहात विरोधकांसोबत पक्षपातीपणा करण्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना मानहानी प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांनी २०१९मध्ये कर्नाटकमधील एका भाषणात मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेवर ३० दिवसांची स्थगिती दिली होती. तसेच, जामीनही मंजूर करण्यात आला होता. असे असतानादेखील लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली.

४ वेळा खासदार म्हणून निवडणून आलेले राहुल गांधी आता ८ वर्ष निवडणूक लढवू शकत नाहीत. तर, काँग्रेसकडून आता उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे लोकसभेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून संसदेच्या आवारात निदर्शने केली गेली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in