नवी दिल्ली : विद्यमान समान नागरी संहितेची चौकट जातीयवादी आणि भेदभावाला प्रोत्साहन देणारी असल्याने त्याऐवजी धर्मनिरपेक्ष समान नागरी संहिता असणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. त्याचप्रमाणे एक देश, एक निवडणूक आणि समान नागरी संहिता या भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचाही मोदी यांनी पुनरुच्चार केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून सलग ११ व्या वेळेस देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी, घटनेतील तत्त्वांचा संदर्भ दिला. देशभरात समान नागरी संहिता असावी, अशी शिफारस त्यामध्ये करण्यात आल्याचे ते म्हणाले. विद्यमान नागरी संहिता ही एकप्रकारे जातीयवादी संहिता असल्याचे समाजातील एका मोठ्या वर्गाला वाटत असून त्यामध्ये तथ्यही आहे. आपण ७५ वर्षे जातीयवादी नागरी संहिता जोपासली, ही नागरी संहिता भेदभावाला प्रोत्साहन देणारी आहे, ही संहिता धर्माच्या नावावर देशात फूट पाडणारी आणि असमानतेला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे आता आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे वाटचाल करावी लागेल. देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहिता असणे ही काळाची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
धर्मनिरपेक्ष नागरी संहिता हा घटनेचा आत्मा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी त्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे घटना तयार करणाऱ्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मोदी यांनी या वेळी बांगलादेशातील स्थितीवर भाष्य केले. तेथील हिंदू आणि अन्य अल्पसंख्य यांच्या सुरक्षेबद्दल १४० कोटी भारतीयांना चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले आणि तेथील जनजीवन लवकरच पूर्वपदावर येईल, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
कोविंद समितीचा अनुकूल अहवाल
देशव्यापी समान नागरी संहिता आणि एक देश, एक निवडणूक यांचा उल्लेख भाजपच्या लागोपाठच्या निवडणूक जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. काही भाजपशासित राज्ये समान नागरी संहितेवर काम करीत आहेत, मात्र त्याची देशभरात अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने अद्याप कोणतीही कायदेशीर उपाययोजना आखलेली नाही. विधि आयोगाने गेल्या वर्षी याबाबत सल्लामसलत सुरू केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध राजकीय पक्षांशी चर्चा करून एकत्रित निवडणुका घेण्याबाबत अनुकूल अहवाल दिला आहे.
‘हा’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान - काँग्रेसची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात विद्यमान समान नागरी संहिता जातीयवादी असल्याचा उल्लेख केला. त्यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी यांचे हे वक्तव्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. विद्यमान समान नागरी संहिता ही जातीयवादी आणि भेदभाव करणारी आहे. त्याऐवजी धर्मनिरपेक्ष समान नागरी संहिता ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य मोदी यांनी केले. त्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला.
राहुल यांच्या आसनव्यवस्थेवरून नाराजी
लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांची स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पाचव्या रांगेत आसनव्यवस्था करण्यात आली. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्षुद्रपणा आणि त्यांना लोकशाही परंपरांबाबत आदर नसल्याचे दिसून आले, अशा शब्दात काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. सर्वांची आसनव्यवस्था अग्रक्रमाच्या तक्त्यानुसार करण्यात आली होती, असे या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितल्यानंतर विरोधी पक्षाने टीका केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात विशेष अतिथी म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले.