महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे; पुढील सुनावणी गुरुवारी होणार

बुधवारी संध्याकाळपर्यंत सरन्यायाधीश घटनापीठात कोणकोणते न्यायाधीश असतील, हे ठरवणार आहेत
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे; पुढील सुनावणी गुरुवारी होणार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. याप्रकरणी पुढील सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची? या वादावर आता घटनापीठच निकाल देईल, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

बुधवारी संध्याकाळपर्यंत सरन्यायाधीश घटनापीठात कोणकोणते न्यायाधीश असतील, हे ठरवणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यामुळे घटनापीठात रमणा असणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, घटनापीठात सरन्यायाधीश रमणा असतील व ते निवृत्त झाल्यानंतर नवीन सरन्यायाधीश त्यांची जागा घेतील, असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत वादावर १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने १० दिवस लांबणीवर टाकली होती. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी अपेक्षित होती; पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायमूर्ती उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली होती. सोमवारीही सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये (पूरक यादी) महाराष्ट्राचे कामकाज मंगळवारसाठी समाविष्ट नसल्याने ही सुनावणी होणार नसल्याचे बोलले गेले; मात्र अखेर सकाळी सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचे प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिल्याने त्यावर मंगळवारी सुनावणी पार पडली.

अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता द्या, या एकनाथ शिंदे यांच्या दाव्यावर निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला विनंती केली. त्यानंतर कोर्टाने हा मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्याची तयारी दाखवली असून, घटनापीठासमोर गुरुवारी होणाऱ्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने लगेच निर्णय घेऊ नये, अशा सूचनाही केल्या आहेत. शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारांच्या पात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची? याबाबत निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. कोर्टाने ती मान्य करत निवडणूक आयोगाला तसे निर्देश दिले.

घटनापीठ म्हणजे नेमके काय?

जेव्हा एखादी घटनात्मक बाब किंवा ज्या प्रकरणांमध्ये कायद्याचे मूलभूत स्पष्टीकरण करावे लागते, तेव्हा त्याची सुनावणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांद्वारे केली जाते. त्या न्यायपीठालाच घटनापीठ असे म्हणतात. भारतातील घटनापीठाची तरतूद संविधानाच्या कलम १४५(३) मध्ये उपलब्ध आहे.

शिंदे गट व शिवसेनेच्या परस्परविरोधी याचिका

शिवसेनेच्या १६ आमदारांची अपात्रता, नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड, पक्षाने काढलेला व्हीप या मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्परविरोधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवल्याने आता पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर हा वाद निकाली निघेल. या माध्यमातून येणारा निकाल हा भारतातील सर्व राज्यांसाठी अशा पेचप्रसंगात पथदर्शक ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in