कन्हेरसर (पुणे): देशातील सर्वाधिक गाजलेला अयोध्येतील राम मंदिर-बाबरी मशीद वादाच्या खटल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या वादग्रस्त खटल्याची सुनावणी करताना तत्कालीन न्यायाधीश व विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देवाचीच करुणा भाकली. 'मी देवासमोर बसलो आणि म्हणालो, देवा तुम्हालाच आता यातून तोडगा काढावा लागेल,' असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
पुण्यातील खेड तालुक्यातील आपल्या मूळ गाव 'कन्हेरसर' येथे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी रविवारी भेट दिली. तेव्हा गावकऱ्यांनी चंद्रचूड यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या भाषणात चंद्रचूड म्हणाले की, आमच्याकडे रोज खटले दाखल होत असतात. पण, तोडगा निघताना अडचणी येत असतात. राम जन्मभूमी बाबरी मशीद खटल्यातही असेच झाले होते. हे प्रकरण माझ्यासमोर तीन महिने होते. तेव्हा मी देवासमोर बसलो. हा खटला सोडवण्यासाठी देवाला प्रार्थना केली. तुम्हालाच आता कोणता तरी तोडगा काढावा लागेल, असे म्हटले. जर कोणाला आस्था, विश्वास असेल तर देव तोडगा काढेल, असे ते म्हणाले.
तुमच्यात श्रद्धा असेल तर देव मार्ग काढतो!
मी रोज पूजा करतो, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुमच्यात श्रद्धा असेल तर देव कोणता तरी मार्ग शोधून काढतोच, असे चंद्रचूड यांनी सांगितले.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा केला. हा खटला १०० वर्षांपेक्षा अधिक काळ चालला होता. हा ऐतिहासिक निकाल देणाऱ्या खंडपीठात चंद्रचूड हेही होते. या खंडपीठाने निकालात सांगितले की, अयोध्येतील अन्य ठिकाणी ५ एकर भूखंडावर मशीद बनेल. हा खटला निकालात निघाल्यानंतर अयोध्येत यावर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर जुलैमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे अयोध्येतील राम मंदिरात गेले होते व तेथे त्यांनी रामाची पूजा केली.