पंतप्रधान पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिका, ग्रीस दौऱ्यावर

ब्रिक्स संघटनेच्या शिखर परिषदेत सहभाग
पंतप्रधान पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिका, ग्रीस दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे मोदी २२ ते २४ ऑगस्टदरम्यान ब्रिक्स संघटनेच्या परिषदेला उपस्थित राहतील. तेथून परतताना २५ ऑगस्ट रोजी एक दिवसासाठी ते ग्रीसला भेट देणार आहेत.

ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स संघटनेची शिखर परिषद २२ ते २४ ऑगस्टदरम्यान जोहान्सबर्ग येथे भरत आहे. या पाच देशांच्या अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहेत. त्यामुळे त्यांनी समन्वयासाठी एकत्र येऊन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. ब्राझिल, रशिया, भारत आणि चीन या देशांच्या प्रतिनिधींनी २००६ साली न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीनंतर एकत्र येऊन या संदर्भात चर्चा केली. रशियातील येकॅतरीनबर्ग येथे २००९ साली त्यांची पहिली परिषद भरली. पुढे २०१० साली त्यात दक्षिण आफ्रिकेलाही सहभागी करून घेण्यात आले.

यंदा जोहान्सबर्ग येथे होत असलेल्या परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे पुतिन या परिषदेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील. जोहान्सबर्ग येथील परिषदेत रशिया आणि चीन त्यांच्या मित्र देशांना ब्रिक्स संघटनेत सामील करण्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या प्रभावाला रोखण्यासाठी चीन ब्रिक्स संघटनेचा वापर करू पाहत आहे. त्याला भारताचा विरोध आहे.

अथेन्स येथे मोदी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटकीस यांची भेट घेतील. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक गुंतवणूक, नौकानयन, हवाई वाहतूक, नागरिकांचे स्थलांतर, सांस्कृतिक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आदी विषयांवर अनेक करार होण्याची अपेक्षा आहे. भारतीयांचा युरोपमधील प्रवेश सुकर करण्याच्या दृष्टीने ग्रीस भारताला बंदरे आणि विमानतळांमध्ये गुंतवणूक करू देण्यास उत्सुक आहे.

४० वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसमध्ये

जोहान्सबर्ग येथून परतताना पंतप्रधान मोदी २५ ऑगस्ट रोजी ग्रीसला भेट देणार आहेत. गेल्या ४० वर्षांत भारतीय पंतप्रधानांनी ग्रीसला एकदाही भेट दिलेली नाही. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ साली ग्रीसला भेट दिली होती, तर ग्रीसच्या पंतप्रधानांनी २००८ साली भारताचा दौरा केला होता.

logo
marathi.freepressjournal.in