नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेशातील फुलपूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि व्ही. पी. सिंग यांनी यापूर्वी फुलपूर येथून निवडणुका लढवल्या आहेत.
काँग्रेसने अद्याप प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण काँग्रेस कार्यकर्ते उत्तर प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांच्या नावाचे पोस्टर्स लावत आहेत. या पोस्टर्सवर ‘वादळ’ असे प्रियांका गांधी यांच्या नावापुढे लिहिले आहे. तसेच ‘फुलपूर ० किमी’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. पंडित नेहरूंचे फुलपूर आता ते फुलपूर राहिलेले नाही. पूर्वी हा ग्रामीण मतदारसंघ होता, परंतु तो आता प्रयागराज शहराचा मोठा भाग फुलपूर मतदारसंघात आला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आता शहरी मतदारसंघ बनला आहे. काँग्रेस नेतृत्वाला प्रियांका यांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाग पाडण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते किती उत्सुक आहेत, हे पोस्टर्सवरूनच दिसून येते.