सावरकर इंग्रजांकडून पैसे घेत होते; राहुल गांधी यांचा सनसनाटी आरोप

‘भारत जोडो यात्रे’ला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तुमकूर येथे पत्रकार परिषद घेतली
सावरकर इंग्रजांकडून पैसे घेत होते; राहुल गांधी यांचा सनसनाटी आरोप

स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते व त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता, असे वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खळबळ उडवली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटिशांच्या राजवटीचे समर्थन केले होते, असा दावाही त्यांनी केला.

‘भारत जोडो यात्रे’ला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तुमकूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पीएफआयपासून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणापर्यंत सर्वच मुद्यांवर आपली मते मांडली. भारताच्या फाळणीविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले, ‘सावरकर इंग्रजांकडून पैसे घेत होते. तसेच ‘आरएसएस’नेही ब्रिटिशांच्या राजवटीचे समर्थन केले होते. आज त्यांच्याच द्वेषाविरोधात ‘भारत जोडो यात्रा’ काढली जात आहे.

‘भारत जोडो यात्रे’चा २०२४ च्या निवडणुकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. देशाची जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त असून सरकार हे मॅनेज करण्यासाठी माध्यमांना नियंत्रित करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जातीयवादाविरोधात संघर्ष

भारतात द्वेष व जातीयवाद पसरवणाऱ्या सर्वच शक्तींशी काँग्रेस लढेल. मग ती कोणत्याही समुदायाची का असेना. भारत जोडो यात्रा याच द्वेष व हिंसाचाराविरोधात काढली जात आहे, असे त्यांनी ‘पीएफआय’ व संघांशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

फडणवीसांची टीका

“स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातील जनता होती. त्यामुळे काँग्रेसने वारंवार त्यांना अपमानित केले. अकरा वर्षे अंदमानच्या कारागृहात त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. अशा स्वातंत्र्यवीर सावकरांचा राहुल गांधी हे अपमान करत आहेत. कारण त्यांना भारत आणि काँग्रेसचा इतिहास माहिती नाही,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, “राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहे की नाहीत? ” असा सवालही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in