ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार

हिंदू असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी दिल्लीतील स्वामीनारायण मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ऋषी सुनक अक्षरधाम मंदिराला भेट देणार

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शेवटच्या दिवशी १० सप्टेंबर रोजी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत. यावेळी ते भगवान स्वामीनारायणाचे दर्शन घेतील. ऋषी सुनक यांनी शुक्रवारीच हिंदू असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी दिल्लीतील स्वामीनारायण मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती शनिवारपासून सुरू झालेल्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारीच दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी ‘जय सिया राम’ म्हणत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना रुद्राक्ष, भगवतगीतेची प्रत आणि हनुमान चालीसाही भेट देण्यात आली. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. भेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आलिंगन दिल्याचे छायाचित्र शेअर केले. दोन्ही देशांमधील व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा झाली, असे सुनक म्हणाले.

मी हिंदू असणे माझ्या दृष्टीने गौरवास्पद आहे. हिंदू संस्कृतीतच माझे पालनपोषण झाले आहे. रक्षाबंधन मी मोठ्या उत्साहात साजरे केले, पण कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ मिळाला नाही. त्यामुळे अक्षरधाम मंदिराला भेट देऊन त्याची भरपाई करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in