संघाच्या दसरा मेळाव्याचे धनखड यांना आमंत्रण; राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २० ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या वार्षिक दसरा मेळाव्यासाठी पाहुणे म्हणून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आमंत्रित केले आहे.
संघाच्या दसरा मेळाव्याचे धनखड यांना आमंत्रण; राजकीय  निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या
संघाच्या दसरा मेळाव्याचे धनखड यांना आमंत्रण; राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या संग्रहित छायाचित्र
Published on: 

किरण डी. तारे

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने २० ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या वार्षिक दसरा मेळाव्यासाठी पाहुणे म्हणून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना आमंत्रित केले आहे. धनखड यांनी २२ जुलै २०२५ रोजी प्रकृतीचे कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून केंद्र सरकार आणि त्यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यातच आता दसरा मेळाव्यासाठी पाहुणे म्हणून धनखड यांना बोलावण्याच्या संघाच्या या निर्णयाने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजीनामा दिल्यानंतर प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेले धनखड या निमित्ताने एका मोठ्या व्यासपीठावर समोर येत आहेत.

नागपूरचे संघचालक राजेश लोया यांनी मंगळवारी जाहीर केले की, या कार्यक्रमासाठी धनखड तसेच इस्रायलचे वाणिज्य महादूत यानिव रेवाच यांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत हे देशभरातील स्वयंसेवकांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत. 'दैनिक जागरण'चे मुख्य संपादक संजय गुप्ता हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतील.

संघाबाबतचा ‘तो’ गैरसमज दूर होईल

‘आम्ही अनेक मान्यवरांना पाहुणे म्हणून बोलावतो. धनखड हे त्यांपैकीच एक पाहुणे असतील’, असे संघाच्या मुंबईतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. हा दसरा मेळावा संघाच्या शताब्दी वर्षाच्या उत्सवाची सांगताही असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक अशी ओळख असणाऱ्या धनखड यांना दिलेले आमंत्रण हे संघाने आपला अधिकार ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे संघाच्या एका नेत्याला वाटते. ‘गेल्या दोन-एक वर्षांपासून संघ हा भाजपपेक्षा दुय्यम भूमिका बजावत आहे, असा एक गैरसमज पसरला आहे. त्यामुळेच विजयादशमी उत्सवातील धनखड यांच्या उपस्थितीने हा गैरसमज दूर होईल’, असे या नेत्याने सांगितले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात जगदीप धनखड यांनी उपस्थित राहून संघाच्या देशकार्याचे आणि वैचारिक धारेचे जाहीर कौतुक केले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)