युक्रेनविरुद्ध रशिया आक्रमक; ६ जण ठार

रस्ते, वाहने, चिल्ड्रन पार्क जिकडे पाहावे तिकडे रॉकेटच्या स्फोटामुळे खड्डे पडले आहेत.
युक्रेनविरुद्ध रशिया आक्रमक; ६ जण ठार

युक्रेनने रशियाला क्रिमियाशी जोडणारा केर्च रेल्वे पूल शनिवारी उद्ध्वस्त केल्यानंतर चिडलेल्या रशियाने अवघ्या ४८ तासांत युक्रेनला भाजून काढले आहे. सोमवारी सकाळपासून रशियाकडून युक्रेनवर एकापाठोपाठ एक ७५ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या स्फोटांमध्ये युक्रेनमधील पार्कोव्ही ब्रिजही उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यात ६ जण ठार झाले आहेत.

पुतिन यांनी युक्रेनच्या राजधानीवर पुन्हा हल्ला चढवला आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन ७ महिने झाले आहेत. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात युद्धाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठे क्षेपणास्त्र हल्ले केले. तथापि, कीव्ह सैनिक आणि नागरिक यांच्यातील तीव्र संघर्षानंतर रशियाने एप्रिलमध्ये कीव्हमधून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. आता पुन्हा एकदा रशियाने कीव्हवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळपासून कीव्हवर रशियन रॉकेट्सचा पाऊस पडत आहे. रस्ते, वाहने, चिल्ड्रन पार्क जिकडे पाहावे तिकडे रॉकेटच्या स्फोटामुळे खड्डे पडले आहेत.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. कीव्हच्या अनेक भागांतून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. कीव्ह व्यतिरिक्त ल्विव्ह, झिटोमिर, खमेलनित्स्की, दनिप्रो आणि टेर्नोपिल शहरांत स्फोट झाले. या हल्ल्याबाबत युक्रेनच्या संरक्षण विभागाने ट्विट केले आहे की, आम्ही झुकणार नाही, आम्ही लढत राहू.

दरम्यान, या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘जी-७’ राष्ट्रांची मदत मागितली आहे. कारण युक्रेन शनिवारी केलेल्या हल्ल्यानंतर पुतीन यांनी अधिक आक्रमकपणे हल्ले करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे युक्रेनवर आणखी हल्ले होण्याची शक्यता दिसत आहे.

युद्ध थांबवा, राजनैतिक मार्ग अवलंबा

युक्रेनमध्ये वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. आस्थापना व नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. शत्रुत्व वाढवणे कोणाच्याच हिताचे नाही. युद्ध थांबवून तात्काळ राजनैतिक व संवादाचा मार्ग अवलंबवा, अशी मागणी भारताच्या परराष्ट्र खात्याने केली आहे. तणाव कमी करण्यासाठी सर्व प्रयत्नांना भारताचे प्रयत्न असेल, असे खात्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in