शिंदे गटाची नवी खेळी; निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत.
शिंदे गटाची नवी खेळी; निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला तातडीने परवानगीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष लांबत चालल्याने शिवसेनेबरोबरच आता शिंदे गटही अस्वस्थ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने नवी खेळी केली आहे. सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कार्यवाहीला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी करत शिंदे गटाने मंगळवारी सुप्रीम कोर्टात एक रीट याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिंदे गटाने या याचिकेद्वारे केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत; मात्र कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयीचा निर्णय लागणे महत्त्वाचे असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे; पण त्याआधीच सुनावणी सुरू व्हावी, अशी विनंती शिंदे गटाने केली आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल कोणतीही हालचाल झालेली नाही. याआधीचे सरन्यायाधीश एन. बी. रमणा हे निवृत्त झाले आणि त्यानंतर ही सुनावणी कधी होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबरच शिंदे गटही अस्वस्थ झाला असून, त्यांनी याबाबतचा निकाल लवकर लागावा यासाठी आता एक नवी चाल रचली आहे.

आज घटनापीठ स्थापन होणार

शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेला न्यायालयीन लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर बुधवारी घटनापीठाची स्थापना केली जाईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. शिंदे गटाने नव्याने दाखल केलेल्या रीट याचिकेनंतर आता सरन्यायाधीश यू. यू. लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या घटनापीठाची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र या प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in