
नवी दिल्ली : भारतात ‘जी-२०’ शिखर परिषदेला येणाऱ्या जगातील बलाढ्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांसाठी लज्जतदार भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या आवडीच्या जेवणाप्रमाणेच त्यांना भारतीय पदार्थ दिले जाणार आहेत. पण, राष्ट्रप्रमुखांना हे जेवण देण्यापूर्वी त्याचा पहिला घास जगातील त्या त्या देशांच्या बलाढ्य गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना भरवला जाणार आहे. त्यांनी 'ओके' म्हटल्यानंतर ते जेवण राष्ट्रप्रमुखांना वाढले जाणार आहे.
राष्ट्रप्रमुख दिल्लीत आल्यानंतर त्यांच्यासाठी न्याहारी, दुपारचे जेवण व रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरले आहेत. काही पदार्थ हे पाहुण्यांच्या आवडीचे केले आहेत तसेच भारतीय व्यंजन त्यांना वाढले जातील. ते वाढण्यापूर्वी जगातील मोठ्या गुप्तचर यंत्रणा त्यांचे भोजन चाखतील. त्यानंतर ते वाढले जातील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत आलेले त्यांचे डॉक्टर भोजन चाखून बघतील. त्यानंतर त्यांना ते जेवायला मिळेल. विशेष म्हणजे, राष्ट्रप्रमुख ज्यावेळी जेवण सुरू करतील तेव्हा त्यावर गुप्तचरांची नजर असेल. अमेरिकेतील सिक्रेट सर्व्हिस व ब्रिटनची ‘एमआय-६’ या गुप्तचर यंत्रणा तेथे हजर असतील.
कोणत्याही राष्ट्रप्रमुखांच्या जेवणाच्या सुरक्षा व जेवणावर विशेष लक्ष पुरवले जाते. कारण अनेकवेळा दोन देश जेव्हा तिसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांच्या वरिष्ठ सदस्यांचे नुकसान करण्याचे कट यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे यजमान देश परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये राहतात तेथे व कार्यक्रमस्थळी जाताना कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यानंतर वेळ येते भोजनाची. येथे आत्यंतिक सतर्कता बाळगली जाते.
अमेरिका कोणावरही विश्वास ठेवत नाही
काही देश यजमानाच्या सुरक्षेवर विश्वास ठेवतात, तर काही देश विश्वास ठेवत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्रपती दुसऱ्या देशात जाताना गाडी, सुरक्षा अधिकाऱ्यांसह जातात. अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिस एजंट भोजनावर लक्ष ठेवतात. ते आपल्या पद्धतीने जेवणाची तपासणी करतात. त्यानंतर राष्ट्रपतींचे डॉक्टर जेवण तपासतात. दोघांनीही हिरवा कंदील दिल्यानंतरच जेवण राष्ट्रपतींना वाढले जाते. राष्ट्रपती जेवताना डॉक्टर हजर असतात. तसेच सिक्रेट सर्व्हिस एजंटकडे राष्ट्रपतींच्या रक्ताची पिशवी असते.
ब्रिटिश पंतप्रधानांपूर्वी ‘एमआय-६’ पोहोचते
ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक जेव्हा परदेशी दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांची गुप्तचर यंत्रणा ‘एमआय-६’ सक्रिय असते. पंतप्रधानांच्या टेबलावर जेवण जाण्यापूर्वी ‘एमआय-६’चे सदस्य जेवण चाखून बघतात. त्यानंतर डॉक्टर ते जेवण तपासतात.
चीनची गुप्तचर यंत्रणा सक्रिय
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे परदेशात जातात तेव्हा त्यांच्यासोबत मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेफ्टीचे (एमएसएस) सदस्य जातात. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर राष्ट्रपती जेवतात.