श्रीलंकेने बांगलादेशाचा १० गडी राखून केला पराभव

श्रीलंकेने बांगलादेशाचा १० गडी राखून केला पराभव

मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने यजमान बांगलादेशचा १० गडी राखून पराभव केला. श्रीलंकेने चौथ्या डावात विजयासाठी मिळालेले २९ धावांचे लक्ष्य तीन षट्कांत एकही विकेट न गमावता साध्य केले. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका १-०ने जिंकली. पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता.

सामन्यात १० विकेट्स घेणाऱ्या आणि बांगलादेशच्या दुसऱ्या डावात ५१ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपणाऱ्या असिथा फर्नांडोला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले, तर ॲन्जेलो मॅथ्यूजला मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने पहिल्या डावात ३६५ धावा केल्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात ५०६ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेने बांगलादेशला दुसऱ्या डावात १६९ धावांत गुंडाळले. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी २९ धावांचे लक्ष्य मिळाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in