जम्मू : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्था कमालीची सुधारली असून तेथील दहशतवाद आता शेवटच्या घटका मोजत आहेत, असे विधाने जम्मू-काश्मीरचे राज्यपाल ले. ज. मनोज सिंह यांनी केले आहे. अत्यंत आत्मविश्वासाने आणि ठामपणे मी सांगू इच्छितो की येथील सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा खूपच सुधारली असून दहशतवाद आता अंतिम श्वास घेत आहे. असे त्यांनी जम्मू शहरातील माता भद्रकाली पीठ येथे जमलेल्या काश्मिरी पंडितांसमोर सांगितले.
तसेच काश्मिरी पंडितांच्या वस्त्यांना वाढीव सुरक्षा देणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. दहशतवादाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, शेजारचा देश जाणीवपूर्वक दहशतवादाच्या कढीला उकळी आणण्याचा प्रयत्न करीत आहे, पण आम्ही त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत आहोत. तसेच येथील काश्मीर पंडितांसारख्या असुरक्षित गटांना पुरेशी सुरक्षा देण्याचे प्रयत्न करीत आहोत. यासाठी पोलीस आणि सुरक्षा दल अविरत झटत आहेत. जम्मूमधील माता भद्रकाली मंदिर हे उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मंदिराची प्रतिकृती आहे. येथे नवमीचा उत्सव जोरदार साजरा करण्यात आला. या उत्सवास राज्यपाल आणि जम्मूमधील काश्मिरी पंडित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काश्मिरी पंडितांबाबत बोलताना सिन्हा पुन्हा म्हणाले की, काश्मिरी पंडित समाजातील कर्मचाऱ्यांसाठी येथे राहण्याची व्यवस्था सवलतीच्या दरात केली जार्इल. त्यांना जमीन देखील दिली जार्इल. सरकारी खात्यांमधील काश्मिरी पंडितांना श्रीनगरमधील गृहप्रकल्पांमध्ये सवलतीच्या दरात जमीन दिली जार्इल. ही व्यवस्था ताबडतोब होर्इल याची आम्ही दक्षता घेऊ. माझे प्रशासन आणि कार्यालय काश्मिरी पंडितांसाठी खुले आहे. त्यांच्या समस्या येथे सोडवल्या जातील. काश्मिरी पंडित समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था आधीपासूनच करण्यात आली आहे. लवकरच त्यांच्या जागा त्यांना दिल्या जातील. त्यांच्यासाठी वाढीव सुरक्षिततेची व्यवस्थाही केली जार्इल. याबाबतचा प्रस्ताव गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.