जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमकीत दहशतवादी ठार

घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल, एक पिस्तूल आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये चकमकीत दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामाच्या द्रबगाम भागात दोन ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी परिसराला वेढा घातला. शनिवारी रात्री उशिरा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, तर इतर चार दहशतवादी रविवारी सकाळी झालेल्या कारवाईत ठार झाले.

सुरक्षादलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले होते, त्यानंतर एक दहशतवादी मारला गेला. घटनास्थळावरून दोन एके-४७ रायफल, एक पिस्तूल आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. “मारले गेलेले सर्व दहशतवादी स्थानिक होते आणि ते लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद शिरगोजरी असे असून तो १३ मे रोजी कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील होता. पुलवामा जिल्ह्यातील फाजील नजीर भट आणि इरफान मलिक अशी अन्य दोन दहशतवाद्यांची नावे आहेत,” असे आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले.

३६ तासांत चार दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीर खोऱ्यात गेल्या ३६ तासांत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील खांडीपोरा भागात शनिवारी सकाळी हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील याच भागात २४ तासांत सुरक्षादलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in