नवी दिल्ली : भारतातील खंडपीठांच्या न्यायाधीशांच्या खुर्च्या समान उंचीच्या का नसतात? असा प्रश्न सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने विचारला. याबाबत कोणत्याही न्यायाधीशाने याकडे लक्ष दिले नव्हते. ब्रिटनहून परतताच सरन्यायाधीशांनी सर्व न्यायाधीशांच्या खुर्च्या समान करण्याचे निर्देश दिले. आता याची अंमलबजावणी पूर्ण झाली आहे. सुप्रीम कोर्टाची देखभाल करणाऱ्या रजिस्ट्री अधिकाऱ्याला चंद्रचूड यांनी पाचारण केले. त्याला न्यायाधीशांच्या खुर्च्यांची उंची समान करायला सांगितली.
सरन्यायाधीशांना प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने अनेक खटल्यांचे ऑनलाईन कामकाज पाहिले होते. त्यावेळी त्याने खुर्च्यांच्या ठेवणीतील असमानता पाहिली. जेव्हा सरन्यायाधीशांशी भेट झाली तेव्हा त्याने हा प्रश्न केला.
सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्री अधिकाऱ्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे न्यायाधीश कोर्ट रुममध्ये आपल्या गरजेनुसार, न्यायाधीश ॲॅडजेस्ट करतात. न्यायाधीशांना अनेक तास बसावे लागते. त्यातून त्यांना पाठदुखीची समस्या निर्माण होते.
सरन्यायाधीशांनी आदेशात म्हटले की, खुर्चीच्या अनेक बाबी ॲॅडजेस्ट करता येतील, अशा बनवा. मात्र त्याची उंची समान असली पाहिजे.
२१ मे ते २ जुलैपर्यंत सुप्रीम कोर्टाला उन्हाळ्याची सुट्टी होती. तेव्हा सर्व खुर्च्या एकसमान व एकासारख्या दिसतील, याची काळजी घेण्यात आली. या खुर्च्यांमध्ये बसताना पहिल्यापासून अधिक सुविधाजनक बनवले आहे.