कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

कोर्टाने यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली

फुटीरतावादी नेता व बंदी घातलेल्या ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा प्रमुख यासिन मलिकला पतियाळा हाऊस कोर्टाने टेरर फंडिंगप्रकरणी १० लाखांचा दंड व जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एनआयए कोर्टाने यासिनला याआधी दोषी ठरवले होते. पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणे याप्रकरणी यासिनवर अनेक गुन्हे दाखल आहेत.

एनआयए कोर्टाने गुरुवारी यासिन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने कोर्टातील सुनावणीदरम्यान काश्मीरमधील दहशवतादी घटनांमध्ये सहभागी असल्याचे मान्य केले होते. त्याला दिल्लीतील पतियाळा कोर्टात आणले गेल्यानंतर त्याच्या शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. निकालाच्या पार्श्वभूमीवर पतियाळा कोर्टाबाहेर सीएपीएफ आणि विशेष दलाचे जवान तैनात करण्यात आले होते.

पतियाळा कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिन मलिकने न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एनआयएने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दहशतवादी कारवायांसाठी जमवला निधी

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी निधी जमवण्यासाठी जगभरात एका नेटवर्कची निर्मिती यासिन मलिकने केली होती. ‘एनआयए’ने ३० मे २०१७ मध्ये एक खटला दाखल केला होता. याप्रकरणी १८ जानेवारी २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी आयएसआयच्या समर्थनासह काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवल्याची माहिती एनआयएने कोर्टात दिली.

यासिन मलिकने १९९० मध्ये दहशतवाद्यांसोबत मिळून वायुसेनेच्या अधिकाऱ्यावर गोळीबार केला होता. त्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर रवी खन्ना यांचा समावेश होता. रवी खन्ना यांच्या शरीरात २८ गोळ्यांचे निशाण आढळून आले होते.

श्रीनगरमध्ये दगडफेक

निकालापूर्वी श्रीनगरमधील यासिनच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या समर्थकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. त्याचवेळी सुरक्षा दलांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. श्रीनगरमधील अनेक बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर आणि लगतच्या भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in