राजस्थानमधील रणकंदन मिटण्याचे चिन्ह अद्याप नाही

मंगळवारी सायंकाळी सुमारे २० आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेण्यासाठी सीएम हाऊसमध्ये दाखल झाले
राजस्थानमधील रणकंदन मिटण्याचे चिन्ह अद्याप नाही

राजस्थान काँग्रेसमध्ये गेले दोन दिवस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून सुरू असलेले रणकंदन मिटण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही. राजस्थानमध्ये काँग्रेसची अवस्था ‘धरले तर चावते, सोडले तर पळते’ अशी झाली आहे. राजस्थानमधील सत्तानाट्याच्या खेळात हे राज्यही आपण गमावू, अशी भीती काँग्रेसला आता सतावत आहे.

मंगळवारी सायंकाळी सुमारे २० आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेण्यासाठी सीएम हाऊसमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या आमदारांमध्ये मंत्री राजेंद्र यादव, सुखराम विश्नोई, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद यांचाही समावेश आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष ए. के. अँटनी यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. अँटनी मंगळवारी रात्री दिल्लीत पोहोचणार असून, रात्री उशिरा किंवा बुधवारी सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. राजस्थानातील घडामोडी पाहता अँटनी यांना बोलावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अँटनी यांना अजय माकन यांच्या अहवालावर कार्यवाही करण्यास सांगितले जाऊ शकते.

दुसरीकडे पवन बन्सल यांनी मंगळवारी दिल्लीत अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, “पवन बन्सल यांनी स्वतः येऊन उमेदवारी अर्ज घेतला आहे. गेहलोत निवडणूक लढवणार की नाही, याविषयी मी काही बोलू शकत नाही,” असे ते म्हणाले. तत्पूर्वी, मिस्त्री यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन अध्यक्ष निवडणुकीबाबत चर्चा केली. संध्याकाळपर्यंत अनेक नवीन नावे समोर येऊ शकतात. राजस्थानमधील घडामोडींनंतर गेहलोत यांच्या नावाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

नोटिसीचे उत्तर देण्यास तयार - महेश जोशी

काँग्रेसचे चीफ व्हीप व बंडखोर आमदारांतील महत्त्वाचे नेते महेश जोशी म्हणाले की, “पक्षश्रेष्ठींनी आम्हाला नोटीस बजावली तर आमची त्याला उत्तर देण्याची तयारी आहे. कुणी शिक्षा दिली तर तीही भोगण्याची आमची तयारी आहे. कोणत्याही आमदाराला जबरदस्तीने यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी बोलावण्यात आलेले नाही. पक्षश्रेष्ठींच्या इच्छेपुढे सर्वजण नतमस्तक आहेत.”

सचिन पायलटही दिल्लीत दाखल

राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले असून, ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता आहे. एका वृत्तात पायलट यांची सोनियांशी चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in