
नवी दिल्ली : अरबी समुद्रात वाढत असलेल्या ‘तेज’ चक्री वादळाची तीव्रता रविवारी शिगेला पोहोचली असून ते येमेनच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे, अशी माहिती केंद्रीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे भारतीयांना या चक्रीवादळापासून सुटका मिळणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ वायव्येला आणि येमेन-ओमान किनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. येमेनचा अल-गैदाह आणि ओमानचा सलालाह या किनाऱ्यांच्या दिशेने सध्या या वादळाची वाटचाल सुरू आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो सोमवार सकाळपर्यंत अधिक तीव्र होणार आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे पुढील तीन दिवसात निघून गेलेला मॉन्सून काही ठिकाणी परतण्याची शक्यता मात्र निर्माण झाली आहे. अर्थातच तो बांगलादेश आणि त्या लगतच्या पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.