ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पुन्हा लटकणार

वस्तूचे वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे
ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण पुन्हा लटकणार

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने काशीस्थित ज्ञानवापी मशिदीचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्यासाठी दिलेल्या निकालाला ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंहा आणि न्या. जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या आव्हान याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने कार्बन डेटिंगसह ज्ञानवापी मशीद परिसराचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्यास अनुमती दिली आहे. केवळ वादग्रस्त भाग सोडून इतरत्र सर्वेक्षण करावे, अशी अट न्यायालयाने घातली आहे. कार्बन डेटिंगच्या तंत्राने शिवलिंगाचे वय काढता येणार आहे. ज्ञानवापी मशीद परिसरात एक शिवलिंगसदृश वस्तू सापडली आहे. त्या वस्तूचे वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. १२ मे रोजी उच्च न्यायालयाने या शिवलिंगाचे वय शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आदेश दिला होता. त्याआधी १४ ऑक्टोबर रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयाने वय शोधून काढण्याचा अर्ज फेटाळून लावला होता.

कारंज्यासारखा व शिवलिंगासारखा दिसणारा दगड मे २०२२ मध्ये ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडला होता. ज्ञानवापी मशीद काशिविश्वनाथ मंदिराच्या अगदी समोर आहे. इलाहाबाद उच्च न्यायालयाने शास्त्रोक्त पद्धतीने वय शोधण्यास परवानगी दिल्यानंतर आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला या कामासाठी पाचारण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in