बंगळुरू : चांद्रयान-३ च्या प्रॉपल्शन मोड्यूलपासून लँडर मोड्यूल गुरुवारी विलग झाल्यापासून विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे वळवण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सुरुवात केली आहे. शुक्रवारी इस्रोने विक्रम लँडरने घेतलेली चंद्राची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
शुक्रवारी इस्रोने विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागाच्या आणखी जवळ नेत त्याचा वेग कमी करण्यास सुरुवात केली. आता लँडर मोड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून कमीत कमी ११३ किमी आणि जास्तीत जास्त १५७ किमी अंतरावरील कक्षेत दाखल झाले आहे. लँडर मोड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर यांचा समावेश आहे. विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची (डीबुस्टिंग) पुढील प्रक्रिया २० ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता करण्यात येणार आहे. अखेर त्याला कमीत कमी ३० किमी आणि जास्तीत जास्त १०० किमी लांबीवरील कक्षेत पाठवून नंतर चंद्रावर उतवण्यास सुरुवात केली जाईल.
दरम्यान, चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरवरील लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेराने (एलपीडीसी) १५ आणि १७ ऑगस्ट रोजी घेतलेली चंद्राची छायाचित्रे इस्रोने शुक्रवारी प्रसिद्ध केली. या छायाचित्रांत चंद्रावरील विवरे दिसत असून, इस्रोने त्यांना फॅब्री, जिओर्दानो ब्रुनो आणि हर्खेबी जे अशी नावे दिली आहेत.