
नवी दिल्ली : विरोधकांनी मणिपूर हिंसाचारासह विविध मुद्यांवरुन प्रचंड गदारोळ घातल्यामुळे सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहातील कामकाज संपूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आले.
राज्यसभेत सकाळच्या सत्रात मणिपूर हिंसाचार मुद्यावरुन विरोधकांनी गोंधळ माजवला. तेव्हा अध्यक्षांना काही शब्द कामकाजातून काढून टाकावे लागले. जेवणाच्या सुट्टीनंतर सदनाचे कामकाज पुन्हा सुरु झाले पण विरोधकांच्या गोंधळात पुन्हा बुडाले. लोकसभेत राजनाथ सिंग यांनी सरकार मणिपूर मुद्यावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले पण विरोधकांच्या आवाजात त्यांचा आवाज लुप्त झाला. यामुळे सदनाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. कॉंग्रेस, डीएमके, आणि डाव्या पक्षांनी जोरजोराने घोषणा देत मणिपूर जळत असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितले. त्याआधी कॉंग्रेसचे खासदार मनिक्कम टागोर आणि हिबी एडन यांनी मणिपूर मुद्यावर तात्काळ चर्चेची गरज असल्याचे सांगत लोकसभा तहकूब करण्याचा प्रस्ताव दाखल केला. टागोर यांनी लोकसभा सचिवांना लेखी निवेदन दिले. त्यात म्हटले की लोकसभेने पंतप्रधानांना बोलण्याचे आदेश द्यावेत. त्यांनी काय उपाययोजना केल्या त्या सदनाला सांगाव्यात. तर एडन यांनी सरकारने धार्मिक अल्पसंख्यंक आणि अनुसुचित जमाती यांचे संरक्षण करण्याची घटनात्मक बांधिलकी जपावी असे लिहिले. गुरुवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. त्या दिवशी देखील राज्य सभा आणि लोकसभा या संसदेच्या दोन्ही सदनांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.