नवी दिल्ली : दिल्लीतील हवेचे वाढते प्रदूषण पाहता सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हवा नियंत्रण व्यवस्थापन कमिशनने दिल्लीत ‘ग्रॅप-४’चे निर्बंध लागू केले आहेत. या अंतर्गत अत्यावश्यक सेवा सोडून सर्व ट्रकच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. केवळ सीएनजी व इलेक्ट्रिक ट्रकना प्रवेश सुरू राहील.
जेव्हा प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत गंभीर होते तेव्हा ‘ग्रॅप-४’चे निर्बंध लागू केले जातात. सार्वजनिक बांधकाम योजना, प्रदूषण करणारे ट्रक यांना दिल्लीत बंदी केली आहे. यातून अत्यावश्यक मालवाहतूक करणाऱ्या ट्रकना वगळण्यात आले आहे. सीएनजी, इलेक्ट्रिक व बीएस-६ मानकांचे पालन करणाऱ्या वाहनांना दिल्लीत प्रवेश आहे.
वर्क फ्रॉम होमचे आदेश
हवेचे प्रदूषण पाहता दिल्ली-एनसीआर क्षेत्रात विविध उपाययोजना लागू करण्याचे ठरवले आहे. त्यात सरकारी व खासगी कंपन्यांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत.
१० नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद
दिल्लीमधील सर्व प्राथमिक शाळा प्रदूषणाच्या वाढत्या चिंताजनक स्तरामुळे १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री अतिशी यांनी एक्सवर तशी घोषणा केली आहे. इयत्ता ६ वी ते १२ वी या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय असून तसा पर्याय शाळांना देण्यास सांगण्यात आला आहे. शनिवारी हवेच्या दर्जाचे प्रमाण (एक्यूआय) घसरून ते दुपारी ४ वाजता ४१५ इतके होते, तर रविवारी सकाळी ७ वा. ते ४६० इतके होते.