नवी दिल्ली : ग्रेटर नॉयडा येथे रविवारी यमुना नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेले दोन तरुण बेपत्ता झाले आहेत. ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, शोधमोहीम सुरू आहे.
धीरज (वय २१) आणि संजित (वय १७) अशी या तरुणांची नावे असून, ते मकानपूर खदर गावचे रहिवासी आहेत. रविवारी सकाळी ते यमुना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले होते, पण बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येऊ लागली. त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन नदीच्या काठावर मिळाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तसेच खास प्रशिक्षित पाणबुड्यांचीही मदत घेतली जात आहे.