इंडिया आघाडीची एकजूट निवडणुकांनंतरच सिद्ध होईल
नवी दिल्ली : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील यशापयशानंतरच इंडिया आघाडीतील एकजूट किती मजबूत आहे, हे स्पष्ट होर्इल. आघाडीतील सूत्रांनुसार, विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत सपाचा हेकेखोरपणा, आम आदमी पक्षाचा हट्टीपणा आणि काँग्रेसच्या कठोर भूमिकेतून ही बाब उघड झाली आहे.
जागा वाटप आणि त्याच्या फॉर्म्युल्याबाबत अनौपचारिक चर्चांचा काळ इंडिया आघाडीच्या समन्वय समितीतीच्या बैठकीच्या माध्यमातून सुरू आहे. समन्वय समितीची एकमेव बैठक झाली आहे. ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत एखादा फॉर्म्युला येईल, असे बैठकीत ठरले आहे. पण, पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने या संदर्भात थांबा आणि वाट पहा, अशी भूमिका घेतली आहे. याचा अर्थ काँग्रेस या निवडणुकीतील यशाच्या आधारे वाटाघाटीची क्षमता ठरवणार आहे. अर्थातच निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे जागा वाटपासाठीच्या वाटाघाटी करणे सोपे होणार आहे.
सूत्रांकडील माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडियाच्या समन्वय समितीची बैठक होईल. या दरम्यान इंडिया आघाडीची प्रचार समिती संयुक्त सभांची रूपरेषा तयार करण्यात गुंतली आहे. संयुक्त सभांसाठी पाटणा, नागपूर, कोलकाता आणि चेन्नई शहरांना प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय ३ वर्किंग गटांच्या बैठकाही सुरू आहेत. यात मीडिया ग्रुपच्या अहवालाची तयारी देखील केली जात आहे. केरळ २०, बंगाल ४२, पंजाब १३ आणि दिल्ली ७ या जागा वाटपाच्या दृष्टिकोनातून कठीण असल्यामुळे त्याबाबतचा निर्णय सर्वात शेवटी घेण्यात येणार आहे.
या राज्यातील निर्णय प्रदेश विभागाकडून
जागा वाटपाबाबतच्या सहमतीनुसार, २७० जागा अशा आहेत, जिथे काँग्रेस ड्रायव्हिंग सीटवर असेल. उर्वरित २७० जागा अशा आहेत जिथे आघाडीतील पक्षांनी सीट शेअरिंग करायची आहे. ४ राज्ये कठीण मानली आहेत आणि त्यांचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. महाराष्ट्र ४८, बिहार ४०, तामिळनाडू ३९ आणि उत्तर प्रदेश ८० च्या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, द्रमुक, जेडीयू, आरजेडी आणि सप मिळून करतील. या राज्यांत एकूण १९७ जागा आहेत.