... तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

जम्मू-काश्मीरमध्ये जोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही. तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा करणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केली.
... तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
PTI File Pic
Published on

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये जोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही. तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चा करणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केली.

जम्मू-काश्मीर विधानसभेचा बिगुल वाजल्यानंतर भाजपने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. जम्मूच्या पलोरा भागात झालेल्या सभेत अमित शहा म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसची आघाडी भारत-पाकिस्तान सीमेवरून पुन्हा व्यापार सुरू करणार आहे. त्यातून मिळालेला निधी दहशतवाद्यांपर्यंत पोहचेल आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता पसरेल. तुरुंगातील दहशतवाद्यांना सोडवण्याची काँग्रेसची इच्छा आहे. पण, भाजप सरकार आल्यास आम्ही हे होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शहा म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस म्हणते, आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ. मी अब्दुल्ला व राहुल गांधी यांना विचारतो. जम्मू-काश्मीरला तुम्ही राज्याचा दर्जा कसा देणार? तुम्ही जनतेला मुर्ख बनवण्याचे काम करत आहात. कारण जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा केवळ भारत सरकारच देऊ शकते, असे शहा म्हणाले.

नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस व पीडीपी म्हणतात, आम्ही पूर्वीप्रमाणे व्यवस्था आणू. हे तुम्हाला मान्य आहे काय? ज्या स्वायत्ततेच्या मुद्यावरून जम्मू-काश्मीरची मोठी हानी झाली आहे. जम्मू-काश्मीरात ४० हजार जण मारले गेले. ते म्हणतात, आम्ही स्वायत्तता देऊ. पण, कोणीही स्वायत्ततेची भाषा करू शकत नाही, असे शहा म्हणाले.

जम्मू-काश्मीरातील निवडणूक ऐतिहासिक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या राज्यघटनेनुसार ही निवडणूक होत आहे. काश्मीरचे दहशतवादामुळे मोठे नुकसान झाले आहे. काश्मीरमधील तात्कालिन सरकारांनी दहशतवादी कृत्याबाबत डोळेझाक केली होती. जम्मू-काश्मीरात शांतता प्रस्थापित झाल्यावर ते येथे येऊन मुख्यमंत्री बनतात. तर दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर दिल्लीत हेच लोक कॉफीबारमध्ये जाऊन कॉफी पितात. भाजपने दहा वर्षात ७० टक्के दहशतवाद कमी केला आहे. काश्मीर खोऱ्यात रात्रीच्या वेळी थिएटर सुरू झाले आहेत, असे ते म्हणाले.

नॅशनल कॉन्फरन्स जम्मू-काश्मीरात सरकार बनवण्याची अफवा पसरली आहे. मी लहानपणापासून निवडणुकीचे आकडे शिकलो आहे. जम्मू-काश्मीरात काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार कधीच बनणार नाही. भाजप मोठ्या ताकदीने निवडणूक लढणार असून जिंकणारही आहे. आता जम्मू-काश्मीरची जनता सरकार बनवणार आहे, असे शहा म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in