
नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांत मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. पश्चिम बंगालमधील धुपगुडी, उत्तर प्रदेशमधील घोसी, झारखंडमधील डुमरी आणि गिरिडीह, केरळमधील पुथुपल्ली आणि त्रिपुरातील धानपूर व बोक्सानगर येथे मतदान घेण्यात आले. निवडणुकीचा निकाल ८ सप्टेंबर रोजी लागणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे.
काँग्रेसचे नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री उम्मेन चंडी यांच्या निधनानंतर पुथुपल्ली येथील जागा रिकामी झाली होती, तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते दारासिंग चौहान राजीनामा देऊन पुन्हा भाजपमध्ये गेल्यानंतर ती जागा मोकळी झाली होती. सातही मतदारसंघांत सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वच ठिकाणी मतदार उत्साहाने केंद्रांवर रांगा लावत होते. दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी चांगली होती. दुपारपर्यंत घोसी येथे ४३ टक्के, डुमरी आणि गिरिडीह येथे ५९ टक्के, धुपगुडी येथे ५१ टक्के, पुथुपल्ली येथे ५० टक्के, तर धानपूर आणि बोक्सानगर येथे सरासरी ७१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
त्रिपुरातील हिंसाचारात ६ जखमी
बहुसंख्य ठिकाणी मतदान शांततेत पार पडले असले तरी त्रिपुरात मतदानाला गालबोट लागले. राज्यातील निवडणूक हिंसाचारात ६ जण जखमी झाले. धानपूर मतदारसंघातील मोहनभोट येथे काही गावकऱ्यांनी सहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जमावाने ५ मोटारसायकलही पेटवल्या. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. जखमींवर रुग्णालयात उपचार होत आहेत.