गहू, तांदूळ, डाळी पाच टक्के महाग; सणासुदीत तेल आणि मैद्याच्या दरातही वाढ

आकडेवारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी तांदळाची किंमत ३७.६५ रुपये प्रति किलो होती
गहू, तांदूळ, डाळी पाच टक्के महाग; सणासुदीत तेल आणि मैद्याच्या दरातही वाढ

महागाईने सर्वसामान्य हैराण झाले असताना पुढील काही महिने दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. दिवाळी काही दिवसांवर आली असताना डाळीच्या आणि खाद्यतेलाच्या दरात पु्न्हा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. उत्पादन घटण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ सुरू असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. गहू, मैदा, तांदूळ, डाळी तसेच तेल, बटाटा आणि कांद्याच्या किमतीतही पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे म्हणणे आहे.

आकडेवारीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी तांदळाची किंमत ३७.६५ रुपये प्रति किलो होती, तर मंगळवारी ती ३८.०६ रुपयांवर पोहोचली. गव्हाचा भाव किलोमागे ३०.०९ रुपयांवरून ३०.९७ रुपये झाला, तर पिठाचा भाव ३५ रुपयांवरून ३६.२६ रुपये किलो झाला. बटाट्याचा भाव २६.३६ रुपये किलोवरून २८.२० रुपये झाला, तर कांद्याचा भाव २४.३१ रुपये किलोवरून २७.२८ रुपये झाला. टोमॅटोचा भाव ४३.१४ रुपयांवरून ४५.९७ रुपये किलो झाला.

तूर डाळीचा दर गेल्या आठवड्याभरात चार ते पाच रुपयांनी वाढला आहे. शिवाय, उडीद डाळ आणि खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. घाऊक बाजारसह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा ११० रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत १२५ ते १३० रुपये किलो इतकी झाली आहे.

चना डाळीचा भाव ७१.२१ रुपयांवरून ७४ रुपये किलो झाला, तर तूर डाळ ११० रुपयांवरून ११२ रुपये प्रति किलो झाली. याच काळात उडीद डाळीचा भाव १०६.५३ रुपयांवरून १०८.७७ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. मूग डाळीचा भाव १०१.५४ रुपये किलोवरून १०३.४९ रुपये झाला आहे. मसूर डाळ ९४.१७ रुपयांवरून ९५.७६ रुपये, तर साखरेचा भाव ४१.९२ रुपयांवरून ४२.६६ रुपये किलो झाला आहे.

९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या दोन दिवसांत साखरेचा भाव ४१.९२ रु. प्रति किलोवरून ४२.६६ रु. झाला आहे. चलन बाजारात रुपयाची घसरण सुरूच आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीही आणखी वाढण्याची भीती आहे. सध्या खाद्यतेल ३ ते ४ रुपयांनी महागले आहे. शेंगदाणा तेल १८५.६२ रु. प्रति लिटरवरून १८९ रु. तर सोयाबिन तेल १४७.२४ वरून १४९.५६ रु. आणि सूर्यफूल तेल १६३.५२ रु. वरून १६७.५८ रु. इतकी भाव वाढ झाली आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. येत्या काळात डाळींचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in