पंतप्रधान मोदींना ७५व्या वर्षी निवृत्ती का नाही? केजरीवाल यांचा भाजप, संघावर हल्लाबोल

आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आयोजित ‘जनता की अदालत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा यांसारखे नेते ७५ व्या वर्षांत निवृत्त झाले, मग हा नियम मोदींना का लागू होत नाही.
पंतप्रधान मोदींना ७५व्या वर्षी निवृत्ती का नाही? केजरीवाल यांचा भाजप, संघावर हल्लाबोल
Published on

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आयोजित ‘जनता की अदालत’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि कलराज मिश्रा यांसारखे नेते ७५ व्या वर्षांत निवृत्त झाले, मग हा नियम मोदींना का लागू होत नाही. हे मोदींना लागू होणार नाही, असे अमित शहा सांगत आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी भाजपसह ‘आरएसएस’लाही धारेवर धरले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अन्य राज्यांतील पक्ष फोडत आहेत. तर संपूर्ण देशात आमीष दाखवून किंवा ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून सरकार पाडत आहेत. हे देशाच्या लोकशाहीसाठी चांगले आहे का? हा प्रकार भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे, यावर मोहन भागवतांचा विश्वास नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांचा आपल्या पक्षात समावेश केला आहे. मोदी, शहा यांनी ज्या नेत्यांना आधी भ्रष्ट म्हटले, त्यांचा नंतर भाजपमध्ये समावेश करण्यात आला. तुम्ही अशा भाजपची कल्पना केली होती का? हा प्रकार संघाला मान्य आहे का?” अशा शब्दांत केजरीवाल यांनी मोहन भागवत यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

“भाजपचा जन्म ‘आरएसएस’मधून झाला असल्यामुळे भाजपला योग्य मार्गावर घेऊन जाण्याची जबाबदारी संघाची आहे. तुम्ही कधी मोदींना चुकीच्या मार्गावर जाऊ नका, असे सांगितले आहे का? भाजपच्या आजच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात का? ‘आरएसएस’ आणि भाजपच्या नियमांनुसार ७५व्या वर्षी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते निवृत्त झाले होते. पण हा नियम पंतप्रधान मोदींना लागू होत नाही का?” असा सवालही केजरीवाल यांनी भागवत यांना विचारला आहे.

बेइमानीचा कलंक घेऊन जगूच शकत नाही

बेइमान असल्याचा कलंक घेऊन काम करणे सोडा, पण मी जगूही शकत नाही. बेइमान असतो तर, मी मोफत वीज तसेच महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा दिली असती का? त्याचे ३ हजार कोटी रुपये मीच हडपले असते. सरकारी शाळा आणि रुग्णालयांची स्थिती चांगली केली असती का? न्यायालय मला निर्दोष ठरवत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे मी तुरुंगातून बाहेर आल्यावर ठऱवले होते. पण या खटल्याचा भरोसा नाही, हे प्रकरण १० ते १५ वर्षे चालू शकते, असे मला वकिलांनी सांगितल्यावर जनता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. भाजप मला बेईमान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, पण माझ्या १० वर्षांच्या राजकारणात आदर, प्रामाणिकपणा आणि तुमच्या प्रेमाशिवाय मी काहीही कमावले नाही, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in