सनातन धर्माचा अपमान होताना राहुल गांधी गप्प का - ठाकूर

राहुल गांधी विदेशात बसून भगवद‌्गीता वाचल्याचे सांगत आहेत
सनातन धर्माचा अपमान होताना राहुल गांधी गप्प का - ठाकूर

नवी दिल्ली : विदेशात भाजप आणि हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना उलट प्रश्न करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतात सनातन धर्माचा अपमान होत असताना राहुल गांधी गप्प का, असे विचारले आहे. केवळ राहुल गांधीच नाही तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे उद्धव ठाकरे हे देखील गप्प बसून तमाशा पाहत आहेत, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे नेते आणि तेथील मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. सनातन धर्म म्हणजे कुष्ठरोग व एड्ससारखा रोग आहे, असे त्यांनी म्हटले होते. हा धर्म विभाजन आणि भेदभावाला बळ देतो. यामुळे हा धर्म नष्ट केला पाहिजे, असे उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी विदेशात बसून भगवद‌्गीता वाचल्याचे सांगत आहेत. तसेच उपनिषदांचा अभ्यास केल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता त्यांना हिंदू धर्म समजला असून भाजप जे करीत आहे तो हिंदू धर्म मुळीच नाही, असे त्यांनी जागतिक पातळीवर सांगितले आहे. विरोधक केवळ सनातन धर्माचा अपमान करण्यातच स्वत:ला धन्यता मानत आहेत. यातून त्यांची मानसिकता दिसून येते. उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उद्घाटनानंतर गोध्रासारखी घटना होऊ शकते, असे विधान केले आहे. यावर ठाकूर यांनी म्हटले आहे की काही लोक आपले मूळ तत्त्वज्ञान विसरले असून भय आणि भ्रम यांचा प्रसार करीत आहेत. त्यांना आता खोटे बोलण्याची सवय जडली आहे, अशा शब्दांत ठाकूर यांनी ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in