
मध्य प्रदेशात ५० टक्के कमिशनचा वाद वाढण्याची शक्यता आहे.या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी तसंच मध्य प्रदेशातील काँग्रेसनेते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी, राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि ज्येष्ठ नेते अरुण यादव यांच्या ट्विटवर वरील एका पोस्टविरोधात भाजप नेत्यांनी तक्रार केली आहे. यानुसार इंदोरच्या संयोगितागंज पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी ज्ञानेश्वर अवस्थी यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीत प्रियंका गांधी यांनी एका वृत्तपत्राचा दाखला देत मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप केला होता. प्रियंका गांधी ट्विट करत म्हणाल्या की, मध्य प्रदेश कंत्राटदारांच्या संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांना पत्र लिहून तक्रार केलीये की, त्यांनी ५० टक्के कमिशन दिल्यानंतर पैसै मिळतात. कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेत होते. मा, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने त्यांचा विक्रम मोडीत काढला आहे.कर्नाटकच्या जनतेने ४० टक्के कमिशन खोरी करणाऱ्या सरकारीच हकालपट्टी केली. आता मध्य प्रदेशातील जनता ५० टक्के कमिशन सरकारला सत्तेवरून हटवेल, असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं.
यावर भाजप कायदेशीर सेलचा कार्यकर्ता निमेश पाठक यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. यावरुन शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंदूरमधील संयोगितागंड येथे भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ४६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणी भाजच्या इतर नेत्यांनी केलेल्या तक्रारीवरुन देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रियंका गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.