नवी दिल्ली : मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जगभर महिला सबलीकरणावर भर दिला जात असून महिलांच्या शरीरावर महिलांचाच हक्क असल्याचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे.
दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याविषयक मंडळाने (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) स्त्री-पुरुष समानतेतून महिला सबलीकरण या संकल्पनेवर भर दिला आहे. जगाची लोकसंख्या सध्या ८ अब्जांचा आकडा पार करत आहे. त्यात महिलांचे प्रमाण साधारण निम्मे आहे. जगातील ४० टक्के महिलांना त्यांच्या लैंगिक आणि पुनरुत्पादनविषयी गरजा आणि हक्कांबाबत निर्णय घेण्याची मुभा नाही. बरेचदा त्या बाबतीत त्यांच्यावर पुरुषांचा किंवा अन्य महिलांचा दबाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे जागतिक पातळीवर लोकसंख्यावाढीला हातभार लागत आहे. जर महिला त्यांच्या शारीरिक गरजा आणि अपत्यप्राप्तीच्या संदर्भात स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकल्या, तर जागतिक लोकसंख्यावाढीला आळा घालता येणे शक्य आहे. हा विचार करून यंदाच्या लोकसंख्यादिनी महिलांच्या शरीरावर महिलांचाच हक्क ही संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदा या दिवशी महिलांमध्ये त्यांच्या शारीरिक गरजा आणि हक्क, आरोग्यविषयक समस्या आदी बाबतींत जागरुकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, संततीनियमनाच्या साधनांची माहिती करून देणे, आहाराच्या योग्य सवयी लावणे अशा उपक्रमांचा यात समावेश होत आहे. अनेक देशांत कार्यक्षम लोकसंख्येत महिलांचे प्रमाण मोठे आहे. असे असूनही एकंदर निर्णप्रक्रियेत त्यांचे स्थान नगण्य आहे. यंदाच्या लोकसंख्या दिनी ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे विशेष आवाहन केले जात आहे.
लोकसंख्या दिनाचा इतिहास
११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५ अब्ज इतकी झाली. त्याच्या स्मरणार्थ डॉ. के. सी. झकेरिया यांनी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळण्याची कल्पना मांडली. संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) १९८९ साली ही कल्पना उचलून धरली आणि १९९० साली ९० हून अधिक देशांनी ११ जुलै रोजी लोकसंख्या दिन साजरा केला. लोकसंख्याविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधणे आणि ते सोडवण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे