'ती' गाडी पाहून तरी पामबीच मार्गावरील अपघात थांबतील...

महापालिकेने पामबीच मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला
'ती' गाडी पाहून तरी पामबीच मार्गावरील अपघात थांबतील...

नवी मुंबईचा नेकलेस समजला जाणारा पामबीच मार्ग अनेकांसाठी काळरात्र ठरत आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने, बेशिस्त वाहतुकीमुळे या मार्गावर प्रतिदिन अपघाताच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून तसेच पालिकेकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असले तरी अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अखेर गांधी स्टाईलने वाहनचालकांना वेग, अपघाताचे गांभीर्य सांगण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पामबीच मार्गावर उंचावर एक अपघातग्रस्त गाडी ठेवली आहे. ही कार सद्यस्थितीत झाकलेली असून लवकरच तिचे अनावरण करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अनोख्या जनजागृतीबाबत विचारले असता वाहतूक पोलिसांनी सांगितले की, ''अतिघाई संकटात नेई'' याची प्रचिती वाहने चालवताना चालकांना यावी म्हणून ही गाडी ठेवण्यात येत असल्याचे सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिका अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असते. अलीकडेच महापालिकेने पामबीच मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. मार्गावर वेग नियंत्रण दर्शिवणारी मोठ मोठी इलेक्ट्रोनिक फलक लावले असूनही चालकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अपघातात होणाऱ्या चुका थांबवण्यासाठी तसेच अपघाताची माहिती मिळण्यासाठी मार्गावर मोठ्या संख्येने सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे. मात्र तरी अपघात थांबण्याचे नाव घेत नाही. अखेर सततच्या कारवाईसोबत गांधीगिरी स्टाईलने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी युक्ती लढवली आहे. पामबीच मार्गावरील आगरी कोळी चौकात एक अपघात ग्रस्त गाडी उंचावर लावण्यात आली आहे. सहजरित्या सर्व वाहन चालकांच्या नजरेस पडावी. अत्यंत छिन्न विच्छिन्न अवस्थेतील गाडी पाहून अपघात झाल्यास आपल्या गाडीचीही अशीच स्थिती होऊ शकते आणि आपल्याला यमराज घेऊन जाऊ शकतात असे चालकांच्या लक्षात येईल म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा एक अनोखा प्रयत्न आहे. असे दृश्य पाहून तरी गाडीच्या वेगावर नियंत्रक ठेवतील अशी अपेक्षा आहे. सध्या या गाडीवर आवरण टाकले असून लवकरच समारंभपूर्वक याचे अनावरण केले जाणार आहे.

- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in