
पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पनवेलजवळ कर्नाळा खिंडीत रविवारी कोकणात जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्सची बस दरीत पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. अमोल तळवडेकर (वय ३२) असे या मृत प्रवाशाचे नाव असून जखमींना कामोठ्यातील एमजीएम आणि पनवेलमधील गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दहिसर येथून सावंतवाडीला निघालेल्या ‘ओमकार’ या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे कर्नाळा खिंडीत प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
अपघातानंतर वाहतूककोंडी
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक, पनवेल तालुका पोलीस दुर्घटनास्थळी पोहोचले. शिवाय पनवेल महापालिका आणि कळंबोली अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम ॲम्ब्युलन्स आणि क्रेनसह घटनास्थळी पोहोचली. त्यांनी अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फुटली. या अपघातानंतर पनवेल तालुका पोलिसांनी निष्काळजीपणे व बेदरकारपणे बस चालवणारा चालक नरेंद्र मोहिते उर्फ सूरज याला अटक केली आहे.