महाराष्ट्र भूषणला गालबोट! उष्माघातामुळे ११ श्री सेवकांचा मृत्यू

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र भूषणला गालबोट! उष्माघातामुळे ११ श्री सेवकांचा मृत्यू

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी रंगलेल्या या सोहळ्यानंतर उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर ६०० जण उष्माघाताने अत्यवस्थ असून अनेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

रात्री उशिरा ११ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेलमधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला जवळपास २० लाखांहून अधिक श्री सदस्यांनी हजेरी लावली होती. पण हा भव्यदिव्य कार्यक्रम रखरखत्या उन्हामध्ये घेतल्याने अनेकांना निर्जलीकरणाचा त्रास होऊ लागला. उष्माघाताचा त्रास होऊ लागताच अनेकांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही त्रास झालेल्या रुग्णांना तातडीने घटनास्थळी असलेल्या ३० मेडिकल बूथमध्ये घेऊन जाण्यात आले. १३ रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्री सेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: एमजीएम रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ झालेल्या श्री सदस्यांची चौकशी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, “आजच्या सोहळ्याला जे श्रीसेवक आले होते, त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चांगल्यात चांगले उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुर्दैवी असून मनाला वेदना देणारी आहे. उपचार घेणाऱ्यांचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल.”

उपाययोजनांचा अभाव, सरकार निष्क्रिय

सोहळ्याच्या अनुषंगाने शासन यंत्रणेने आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही भर उन्हात श्री सदस्यांना तब्बल सहा-तास बसवून ठेवण्यात आले. परिणामी कार्यक्रम सुरू असताना ऍम्ब्युलन्सचे सायरन एका मागोमाग वाजू लागले होते. उष्माघातामुळे अनेक श्री सदस्य बेशुद्ध होऊ लागले होते. त्यात कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. त्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास दीड-दोन तास लागले. उपस्थित जनसमुदायाला प्यायला पाणी कमी पडल्याने अनेकांना जागोजागी भोवळ येत होती. त्यात बस स्थानक, रेल्वे स्थानकाकडे चालत जाणेदेखील श्री सदस्यांना कठीण झाले होते. श्री सदस्यांना नेण्यासाठी ठेवण्यात आलेली सार्वजनिक वाहने बराच वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने त्यांना भर उन्हात ३-४ किलोमीटर चालावे लागले. उष्माघातामुळे त्रास असह्य झाल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालय, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय, खारघर येथील मेडिकोव्हर रुग्णालय व खारघर येथील टाटाच्या ॲट्रॅक्ट रुग्णालयात जवळपास ३८ ते ४० श्री सदस्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी अनेक रुग्ण अत्यवस्थ झाले होते. तर काही श्री सदस्य जागेवरच गतप्राण झाले.

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : काँग्रेस

दरम्यान, सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम भर दुपारी एप्रिल महिन्यात ठेवला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेकजण गंभीर आहेत. सरकारने केलेला हा मनुष्यवध आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in